

मुंबई : दादर स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्यावरून गेल्या काही काळापासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. केंद्र सरकारकडे पाठवला जाणारा नामकरणाचा प्रस्ताव हा दादर रेल्वे स्थानकासाठी नसून दादर मेट्रो स्थानकासाठी असल्याची महत्त्वपूर्ण माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराला विरोध करणाऱ्या नेत्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या (DGIPR) एका प्रसिद्धीपत्रकात चुकून 'दादर रेल्वे स्थानक' असा उल्लेख झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या पत्रकामुळे दादर रेल्वे स्थानकाचेच नाव बदलले जाणार असल्याची चर्चा रंगली होती आणि त्यावरून राजकीय वादही सुरू झाले होते. मात्र, कोणत्याही मेट्रो स्थानकाचे नाव बदलायचे असल्यास त्यासाठी केंद्र सरकारकडे रीतसर प्रस्ताव पाठवावा लागतो. प्रशासकीय पातळीवर तपासणी केल्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे स्थानकाचा नसून दादर मेट्रो स्थानकासंदर्भातच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सचिन खरात यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, मात्र त्याच वेळी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दाही लावून धरला आहे. दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्याच्या घोषणेबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो, परंतु दादर रेल्वे स्थानकालाही 'चैत्यभूमी' नाव देण्यात यावे, ही आमची भूमिका यापुढेही कायम राहील, असे खरात यांनी स्पष्ट केले आहे.
यासोबतच त्यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यातील प्रमुख नेत्यांना थेट सवाल केला आहे. दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध करणारे ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत, मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांची ही भूमिका अनुक्रमे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का, असा सवाल खरात यांनी विचारला आहे. या सर्व प्रमुख नेत्यांनी दादर नामांतराबद्दल आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंबेडकरी समाज त्यांना कधीही माफ करणार नाही, असा थेट इशाराही सचिन खरात यांनी दिला आहे.
मेट्रो स्थानकाच्या नामांतराचा तिढा सुटला असला तरी, सचिन खरात यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.