

मुंबई : न्यायालयाची बंदी झुगारून कबुतरांना खाऊ घालणारच या ईर्षेने पेटून उठलेला जैन समाज आणि बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज असलेली यंत्रणा आणि जागरूक दादरकर यांच्यात संघर्ष भडकण्यास सुरुवात झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून दादरच्या कबुतरखाना परिसरात शनिवारी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.
या पथकाला निमंत्रण दिले ते लालबागचे रहिवासी असलेले महेंद्र संकलेचा यांच्या पान 1 वरून... घुसखोरीने. शनिवारी हे गृहस्थ आपल्या लालबागच्या घरून गाडीने निघाले आणि कबुतरखान्यावर धडकले. तिथे स्वत:च्या गाडीच्या टपावरच कबुतरांना खाद्य देण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्यांच्या या उद्योगाने स्थानिक मंडळी संतापली. ती संकलेचा यांना जाब विचारू लागली. या विरोधाला प्रतिआव्हान देत संकलेचा म्हणाले, आणखी अशा 12 गाड्या येणार आहेत! जी काय अॅक्शन घ्यायची ती घ्या. माझ्या गाडीचा नंबर घेऊन आरटीओला तक्रार करा’, असे त्याने धमकावले.
संकलेचा यांच्या मुजोरीने कबुतरांना विरोध असलेले स्थानिक रहिवाशी भडकले. कबुतरांनी आधीच त्रस्त असलेले हे लोक आता अंगावर येतील हे लक्षात येताच संकलेचा महाशय तेथून सटकले आणि पुढील अनर्थ टळला. दादरच्या एका रहिवाशाने काढलेल्या व्हिडिओमुळे हे महाशय लालबागच्या चिवडा गल्लीतील मॅग्नम टॉवरमध्ये राहणारे महेंद्र संकलेचा नामक इसम असल्याचे स्पष्ट झाले. शिवाजीपार्क पोलिसांनी महेंद्र संकलेचा याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याची कारही जप्त केली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी कबुतरखाने बंद केले. दादरच्या कुूतरखान्याला मुंबई महापालिकेने ताडपत्रीने झाकले होते. मात्र जैन समाजाने आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलकांनी कबुतरखान्यामध्ये घुसून ताडपत्री सोडवून कबुतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. यावर न्यायालयाने ताशेरेही ओढले. आता तर दादरच्या कबुतरखान्याजवळ दंगल विरोधी पथकच तैनात झाले आहे.
गेल्या आठवड्यांपासून दादर कबुतरखान्यातील कबुतरांना दाणा - पाणी टाकणे बंद असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दाणा - पाणी टाकणे बंद असल्यामुळे याठिकाणी येणार्या कबुतरांची संख्याही कमी झालेली आहे. अशाप्रकारे किमान महिनाभर कबुतरांना दाणा - पाणी खाऊ घालणे बंद केले तर कबुतरांचा येथील अधिवास नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.