

मुंबई: सोमवारी गणेश चतुर्थी असल्याने विविधरंगी नैसर्गिक फुले व आकर्षक पुष्पहार, दुर्वा, दुर्वा कंटीहार आदी साहित्य खरेदीसाठी दादरच्या फुल बाजारात मुंबईकरांची रविवारी झुंबड उडाली होती. दिवसभर पावसाने रिपरिप लावली असली तरी बाजारात गर्दी कमी झाली नसल्याचे चित्र होते.
मुंबई शहर व उपनगरांत पंधरा दिवसांपासून सार्वजनिक गणेश तरुण मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन वाजत गाजत होत आहे. सोमवारी (दि.१४) घरगुती व सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.
त्यापार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून दादर, भुलेश्वर, मस्जिद बंदर, काळबादेवी परिसर या मोठ्या बाजारपेठेसह उपनगरांतील बाजारपेठेत गणेश मूर्तींचे विविध सजावट साहित्य घेण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती.
मुंबईतील फुलबाजारात पुणे जिल्ह्यामधील जुन्नर, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व कराड तालुक्यातून तर नाशिक, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमधून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होते. दादर फुल बाजारात पूर्वी दिवसाला ३० ते ४० टेम्पो हे फुलांचे बकेट्स भरून येत असत. मात्र; गणेश उत्सवामुळे रोज ८० ते १०० टेम्पोमधून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
यंदा सर्वप्रकारच्या फुलांचे दर सरासरी २० टक्के वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. साधा पुष्पहार ५० रुपये तर चांगल्या दर्जाच्या गुलाब लावलेले व आकर्षक असा पुष्पहार दीडशे ते दोनशे रुपयांच्या घरात होता.
तसेच दरवाजासाठी लागणाऱ्या झेंडू आणि हिरव्या पानांच्या फुलांचा पुष्पहार एक मीटरसाठी ८० रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत भाव होता. तसेच दूर्वा पेंडी ३० रुपये, दुर्वा कंटीहार शंभर रुपये असा दर होता.
दरम्यान, दादर रेल्वे स्थानकाबाहेर आणि स्थानकावरील शेडमध्ये विक्रेते बसले होते. एकीकडे; गर्दी आणि दुसरीकडे; पाऊस यामधून पादचारी वाट काढत होते. त्याचबरोबर सेनापती बापट रस्त्यावरील एका बाजूला फुल विक्रेते बसल्याने तिथेही गर्दी झाली होती. त्यामुळे चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
दृष्टिक्षेपात : रविवारचे प्रतिकिलो दर
झेंडूची फुले-पूर्वी २० ते चाळीस रुपये, आता ५० ते ८० रुपये
शेवंती -पूर्वी ३० ते ४० रुपये, आता ८० ते १०० रुपये
कलर शेवंती - पूर्वी ८० ते१०० रुपये, आता १२० रुपये
मोगरा -पूर्वी ६०० ते ८०० रुपये, आता १ हजार ते १२०० रुपये
गुलाब -पूर्वी १००ते १२०, आता २०० ते २५० रुपये
गुलाब मिरॅकल -पूर्वी १२० ते १५०, आता २६० ते ३०० रुपये
लिली - पूर्वी १०० रुपये, आता ३०० ते ४०० चारशे रुपये
चाफा -(१०० नग) पूर्वी दीडशे रुपये, आता ४०० ते ८०० रुपये
जास्वंद -(शंभर नग) पूर्वी १०० रुपये, आता ४०० रुपये
गुलाब बंडल- (२० नग) पूर्वी ३० ते ४० रुपये, आता ६० रुपये
सर्वप्रकारच्या फुलांचे दर वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. पुढील पाच दिवस फुलांचे दर असेच राहण्याची शक्यता आहे.
- दीपक रोकडे, फुल विक्रेते, दादर