मुंबई : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी व मुसळधार पावसामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या पंचनाम्यानंतर राज्य सरकारने शुक्रवारी शेतकर्यांना नुकसानीसाठी 73 कोटी 91 लाख 43 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर या आठ जिल्ह्यांतील बाधित शेतकर्यांना ही भरपाई मिळणार आहे. नुकसानीची रक्कम शेतकर्यांच्या थेट खात्यामध्ये दिली जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 29 जिल्ह्यांतील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना 37 लाख 40 हजार रुपये तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी 73 कोटी 54 लाख 3 हजार मदतीचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यात 396 शेतकर्यांच्या 215 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 18.28 लाख रुपये, तर सोलापूर जिल्ह्यात जुलै 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार 59 हजार 110 शेतकर्यांच्या 56 हजार 961.73 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 5979.17 लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली.
नागपूर जिल्ह्यात जूनमध्ये
1 बाधित शेतकर्याच्या 0.40 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 9 हजार रुपये, तर जुलैमधील नुकसानीच्या मदतीसाठी नागपूर जिल्ह्यातील 7 हजार 450 शेतकर्यांच्या 4559.62 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 392.83 लाख रुपये, वर्धा जिल्ह्यात जूनमध्ये 821 शेतकर्यांच्या 485.80 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 41.54 लाख, तर जुलैमधील नुकसानीच्या मदतीसाठी 2 हजार 827 शेतकर्यांच्या 2224.91 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 189.22 लाख, चंद्रपूर जिल्ह्यात जून व जुलैमधील नुकसानीच्या मदतीसाठी 13 हजार 742 शेतकर्यांच्या 8621.06 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 733.00 लाखाच्या मदतीचा समावेश आहे.
भरपाईच्या रकमेतून कर्जाची वसूली करण्यास मनाई
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्यांना दिलासा म्हणून भरपाईची रक्कम थेट बँकेत जमा केली जाणार आहे. मात्र, ही भरपाईची रक्कम बँकांना कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करता येणार नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील 980 शेतकर्यांच्या 55.65 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 11 लाख 81 हजार रुपये
रत्नागिरी जिल्ह्यातील 560 शेतकर्यांच्या 71.54 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 12 लाख 96 हजार रुपये
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 335 शेतकर्यांच्या 50.64 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 12 लाख 63 हजार रुपये असे
एकूण 1 हजार 875 शेतकर्यांच्या 177.83 हेक्टरवरील बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून 37 लाख 40 हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.