

मुंबई ः मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती करायला महाराष्ट्रातील खासदार मर्यादा ओलांडून पुढे सरसावणार असल्याची शक्यता आहे. देशपातळीवर भाजपप्रणीत ‘एनडीए’ला लोकसभेतील 300 पेक्षा जास्त खासदार आमच्या पाठीशी असल्याची द्वाही फिरवता येईल, अशी रचना करायची आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेतील खासदारांची 4 ते 6 मते फुटण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे.
सत्ताधारी आघाडीत प्रवेशण्यास उत्सुक असलेली खासदार मंडळी यानिमित्ताने निष्ठांचा लंबक सरकवण्याची तयारी दाखवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या लोकसभेत महाराष्ट्रातून 30 विरोधी खासदारांना कौल मिळाला आहे. त्यात काँग्रेसचे 13, ‘उबाठा’चे 9, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला ‘उबाठा’चे काही खासदार आहेत, अशी कुजबुज सुरू असते.
आपण महाराष्ट्रात शक्तिशाली आहोत, हे दाखवण्यासाठी शिंदे गट काही घडवून आणण्याच्या तयारीत आहे; मात्र त्यांच्या एका नेत्याने मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काही भव्यदिव्य न घडवता शांत राहणे योग्य ठरेल, असा निरोप आम्हाला दिला गेला आहे. त्यामुळे जे घडणार आहे ते आताच नाही, असे ठरले असल्याचा दावा केला. मात्र, तरीही उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत बघा काय होतेय ते, असे सूचक उद्गारही काढले. पक्षचिन्हाबाबतची सुनावणी, तसेच निकाल लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार असल्याने गुप्त मतदानात मते वाढवून दाखवायची एवढाच मर्यादित कार्यभाग यावेळी साधला जाईल, असे समजते.
शरद पवार गटातही काही हालचाली सुरू असल्याचा दावा अजित पवारांच्या एका निकटवर्तीयाने केला असून, काही बोलायचे कशाला, काय होतेय ते दिसेलच, असे सांगितले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसनेही खासदारांवर लक्ष ठेवले असून, तीन जणांवर बारकाईने नजर आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर नाराज असलेले काही नेते पडद्यामागून हालचाली करीत आहेत, असे समजते. त्यामुळे काही खासदारांना हे नेते प्रभावित करतात काय, याची मोर्चेबांधणी केली गेली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अनंत गाडगीळ, तसेच सचिन सावंत यांनी मात्र आमची मते कुठेही जाणार नाहीत, असा दावा केला.
भाजपला समर्थन देणार्या बिहारमधील जनता दल संयुक्त आणि आंध्र प्रदेशातील तेलगू देसमची काही मते अस्थिर आहेत, त्यामुळेच भाजपने मतांचे लक्ष्य वाढवले असल्याचे बोलले जाते आहे. मतचोरीची भाजपला सवय आहे, त्यामुळे बोलायचे तरी काय, अशी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
राज्यसभेतील खासदारांवरही ‘लक्ष’
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान आहे. राज्यसभेतील खासदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. भाजप 9, अजित पवार गटाचे 2, एकनाथ शिंदे समर्थक 1 आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशी सत्ताधार्यांची राज्यसभेतील बेरीज 13 आहे, तर विरोधी पक्षाचे 7 खासदार आहेत. स्वत: शरद पवार, फौजिया खान असे दोन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी असे दोन ‘उबाठा’चे सदस्य आहेत. प्रियंका चतुर्वेदी नुकत्याच पंतप्रधान मोदी यांना भेटून आल्याने शंका व्यक्त केली जात असली, तरी त्या आमच्यासमवेत आहेत, यावर शिवसेना ठाम आहे.
सध्या भाजपला लक्ष्य केले असले, तरी आमच्या पाठीशी अधिक खासदार असल्याचे निकाल दाखवतील, असा सत्ताधार्यांचा दावा आहे. महाराष्ट्रात लोकसभेचे निकाल वेगळे लागले, तरी परिस्थिती अनुकूल झाली आहे, याबद्दल भाजपला विश्वास आहे. महाराष्ट्राची माहिती असलेले विनोद तावडे या निवडणुकीचे सत्ताधारी पक्षासाठी संचालन करीत आहेत, हे उल्लेखनीय.
श्रीकांत शिंदे प्रक्रियाप्रमुख, भूपेंद्र यादवांकडे न्याहारी !
महाराष्ट्रातील खासदारांच्या मतांकडे लक्ष ठेवण्यासाठी योग्य नियोजन झाले आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा तीन प्रमुख निरीक्षकांमध्ये समावेश आहे. मतदान प्रक्रियेच्या संचालनासाठी राज्यवार जबाबदारी वाटून दिली जाणार आहे. महाराष्ट्राची माहिती असलेल्या भूपेंद्र यादव यांच्याकडे खासदार न्याहारी करतील आणि तेथून मतदानासाठी जातील. याप्रकारे सर्व राज्यांसाठी एकेक प्रमुख नेमला गेला आहे.