C.P. Radhakrishnan : हुकलेले केंद्रीय मंत्रिपद ते संभाव्य उपराष्ट्रपतिपद

राधाकृष्णन् उपराष्ट्रपती होणार हे जवळपास निश्चित
C.P. Radhakrishnan
सी.पी.राधाकृष्णन्pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

तमिळनाडूसारख्या भारतीय जनता पक्षाला पूर्णत: प्रतिकूल असलेल्या राज्यातील कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून सी.पी.राधाकृष्णन् 1998 आणि 1999 साली निवडून आले तेव्हाच ते केंद्रीय मंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले होते. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांची निवड केलीही होती पण काही लोकांच्या मते समीकरणे बदलली तर काही माहितगारांनुसार अनावधानाने भलत्या व्यक्तीला निरोप गेला अन केंद्रीय मंत्रिपद हुकले. मात्र त्या वेळी न मिळालेली संधी आता वेगळ्या स्वरुपात प्रत्यक्षात आली असून भाजपकडचे बहुमत लक्षात घेतले तर राधाकृष्णन् उपराष्ट्रपती होणार हे जवळपास निश्चित आहे.

तमिळनाडूत काही राजकीय हालचाली होताहेत अन राधाकृष्णन् यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली जाणार आहे अशीही कुजबूज सुरु झाली होती. धनकड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारकडे हे पद सोपवले जाईल की दक्षिणेला, असे अंदाज बांधले जाऊ लागले अन् लंबक दक्षिणेवर स्थिरावला तर राधाकृष्णन् यांची निवड होईल हेही स्पष्ट होते.

रविवार दुपारी ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले अन् काहीतरी घडतेय याचा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांना आला. माजी अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )चे नेते जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे परिषदेतील आमदार मिलिंद नार्वेकर अशा भेटी सकाळी आटोपल्या अन् संध्याकाळी उपराष्ट्रपतिपदासाठी सी.पी. राधाकृष्णन् यांचे नाव घोषित झाले.

तरुण वयापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणारे राधाकृष्णन् बाहेरचे नाहीत. वस्त्रोद्योगात मोठा व्यवसाय उभ्या करणार्‍या या नेत्याची क्रीडाक्षेत्रातील रुची, विदेशातला प्रवास यामुळे ते प्रतिष्ठेचे उपराष्ट्रपतिपद योग्यपणे हाताळतील याबद्दल केंद्रातील सत्ताधार्‍यांना कमालीचा विश्वास आहे. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 21ऑगस्ट असल्याने ते येत्या एकदोन दिवसांत दिल्लीला जातील असे समजते. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण कायमच पूर्ण तयारीनिशी सांभाळतो असे सी.पी.राधाकृष्णन् यांना सांगितल्याचे समजते.

कोणत्याही वादात न अडकलेले राज्यपाल

महाराष्ट्रात वर्षापूर्वी राज्यपालपदावर दाखल झालेले राधाकृष्णन् अगदी पहिल्याच प्रतिक्रियेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राज्यपाल झालो याबद्दल मी आनंदी आहे असे म्हणाले होते.शिवाजी महाराज नसते तर आपली ओळख ही राहिली नसती, वेगळी झाली असती, असेही ते अन्य कोणताही उल्लेख न करता म्हणाले होते. राज्यपालपद सांभाळत असताना राज्यात पुन्हा महायुती निवडून आली अन् कोणत्याही वादात न पडता, अयोग्य चर्चाविषयात न झळकता राधाकृष्णन् कर्तव्य पार पाडत राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news