

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड कंपनीच्या प्रतीक्षा नगर आगारातील महिला बस वाहक यांनी विनयभंगाची तक्रार केली होती. त्यांनतर संबंधित अधिकारी फरार झाला असून, त्यांच्या जागी धारावी आगारातून तात्पुरता पदभार स्वीकारण्याकरता पाठवलेल्या अधिकाऱ्यांना प्रतीक्षा नगर आगारात मारहाण झाली. या घटनेचा निषेध म्हणून आज (सोमवार) सकाळ पासून सर्व मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यांचा फटका मुंबईकराना बसला आहे. (BEST)
बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावरील बस आहेत. त्यात मातेश्वरी कंपनीच्या देखील बस आहेत. या कंपनीच्या एका अधिकाऱ्याला मारहाण झाल्याच्या निषेध करण्यासाठी कंत्राटी चालक, वाहकांनी सोमवार सकाळ पासूण काम बंद आंदोलन सुरु केले आहे. रविवारी दिवसभर बस मार्गांवरती चालल्यानंतर रात्री सीएनजी भरला जातो. तो सीएनजी भरण्याकरता चालक आलेच नाहीत. त्यामुळे सर्व बस सीएनजी न भरताच आगारात उभ्या आहेत. यामुळे सकाळी बस डेपोतून बाहेर पडल्या नाहीत.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बेस्टच्या वाहतूकिचा खोंळबा झाल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. वारंवार विविध कारणास्तव काम बंद आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरण्यात येत आहे.