Maharashtra Vidhansabha Election 2024 | मविआमध्ये विधानसभा जागावाटपावरील चर्चेसाठी काँग्रेसची समिती जाहीर

Maharashtra Vidhansabha Election
मविआमध्ये विधानसभा जागावाटपावरील चर्चेसाठी काँग्रेसची समिती जाहीरFile Photo

नवी दिल्ली: महाविकास आघाडीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासाठीच्या चर्चांना वेग आला आहे. तिन्ही पक्षातील नेते यावर भाष्य करत असताना काँग्रेसने आज जागा वाटपासाठीच्या चर्चा आणि वाटाघाटींसाठी समिती नेमली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सात तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे तीन असे एकूण दहा सदस्य आहेत.

काँग्रेसने जागा वाटपासाठीच्या चर्चेसाठी नेमलेल्या समितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी मंत्री सतेज पाटील यांचा समावेश आहे. तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीमधून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री असलम शेख यांचा समावेश आहे. या समितीमध्ये काँग्रेसने पक्षांतर्गत सामाजिक-प्रादेशिक समतोल राखण्याचाही प्रयत्न केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अनुमतीने काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही समिती जाहीर केली. आगामी काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना ठाकरे गट एकत्र महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार आहेत. एकत्र निवडणूक लढत असताना जागावाटप आणि त्या संदर्भातील वाटाघाटी करण्यासाठी काँग्रेसने समिती जाहीर केली.

लोकसभा निवडणुकीत पहिला क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मोठ्या भावाच्या भूमिकेत जाण्याची तयारी केल्याचे समजते. यासाठीचेच प्रयत्न म्हणून काँग्रेसने जागा वाटपासाठीच्या चर्चेसाठी समिती घोषित केल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news