

मुंबई : नॅशनल पार्क म्हणून केेंद्र सरकारनेच अधिसूचित केलेल्या आणि असंख्य प्राण्यांचे अभयारण्य असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जागतिक दर्जाचे ‘अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ (एबीव्हीपी)’ आणि संपूर्ण नॅशनल पार्क आणि लगतची आरे मिल्क कॉलनी मिळून एकात्मिक शहर विकसित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर झाला आणि जानेवारी 25 पासून राज्य सरकारनेही या प्रस्तावावर मत विचारणारी दोन पत्रे आणि एक स्मरणपत्र राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांना पाठवल्याने निसर्गप्रेमींचे धाबे दणाणले आहेत.
बिहारच्या मिर्झापूरमध्ये आणि मिरा रोडला कॅम्पस असलेल्या पंडित यशदेव एज्युकेशनल चॅरिटेबल सोसायटी/ट्रस्टचे आरडी झा यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारला दिला. आधी संजय गांधी नॅशनल पार्क हे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी पार्क असे नाव त्यांनी सुचवले. त्याच नामकरणाच्या प्रस्तावात नॅशनल पार्कमध्ये जागतिक दर्जाचे अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्यासोबतच संपूर्ण नॅशनल पार्क आणि आरे कॉलनी मिळून एक एकात्मिक शहर विकसित करण्याच्या प्रकल्पात आपल्या ट्रस्टला रस असल्याचे त्यांनी या प्रस्तावात स्पष्ट केले.
राज्य सरकारने सारखी विचारणा केल्यानंतर या कल्पनेला मुख्य वनसंरक्षकांनी स्पष्ट विरोध दर्शवला असला तरी नॅशनल पार्कच्या मुळावर घाव घालणारे हे प्रयत्न थांबणार का, असा प्रश्न आहे.