Colaba Navy Family Death Case: नेव्ही नगर कुटुंब मृत्यूमागे कौटुंबिक कलह की पोस्टिंगचा ताण?

मालमत्ता आणि पैशांच्या व्यवहारावरून कुटुंबीयांमध्ये काही वाद होते का, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
Mumbai Sailor death
Mumbai Sailor deathAI Photo
Published on
Updated on

मुंबई: कुलाब्यातील न्यू नेव्ही नगर येथे नौदल जवान, त्यांची पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कौटुंबिक वाद, नौदलातील पोस्टिंगचा ताण आणि जवानाची मानसिक स्थिती या तीनही अंगांनी तपास सुरू आहे. मालमत्ता आणि पैशांच्या व्यवहारावरून कुटुंबीयांमध्ये काही वाद होते का, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

नौदल जवान पुरणमल शंभूलाल मेहरा (३०), त्यांची पत्नी ओमा (२८), तीन वर्षांचा मुलगा यश आणि दोन महिन्यांचे बाळ हे १५ ऑगस्ट रोजी न्यू नेव्ही नगरमधील निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. पुरणमल गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर पत्नी व दोन्ही मुले बेडवर आढळली. पत्नी आणि मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय आहे.

Mumbai Sailor death
Agriculture Admission 2026: कृषी अभ्यासक्रमाची पहिली फेरी जाहीर; १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी

पुरणमल आणि त्यांच्या सासऱ्यांमध्ये घटनेच्या काही दिवस आधी दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते. त्यावेळी ओमाने वडिलांकडे माहेरी घेऊन जाण्याची विनंती कली हाेती. या वादाचा पुढील घटनाक्रमाशी काही संबंध होता का, याचा पोलिस शोध घेत आहेत. पुरणमल यांचे त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांशी मालमत्तेच्या कारणावरून संबंध ताणले होते का, याचीही चौकशी सुरू आहे.

दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर पुरणमल यांनी जहाजावरील ड्युटीऐवजी कार्यालयीन स्वरूपाची पोस्टिंग देण्याची मागणी केली होती. घरात दोन लहान मुले असल्याने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आणि कुटुंबापासून दूर राहण्याचा ताण यामुळे त्यांनी ही मागणी केली असावी. अपेक्षित पोस्टिंग मिळाली होती की नाही, तसेच त्याचा त्यांच्या मनःस्थितीवर काही परिणाम झाला होता का, याचाही तपास केला जात आहे.

Mumbai Sailor death
Air India Pilots Drug Test: एअर इंडियाच्या अन्य दोन वैमानिकांची प्राथमिक ड्रग्ज चाचणी ‘पॉझिटिव्ह’

'आमचे मृतदेह घेऊन जा' संदेशाची पडताळणी

घटनेच्या आदल्या रात्री पुरणमल यांनी राजस्थानातील वडिलांच्या मोबाईलवर ‘येऊन आमचे मृतदेह घेऊन जा’, असा संदेश पाठवल्याचे समोर आले आहे. हा संदेश सकाळी कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यानंतर नौदलाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला आणि कर्मचाऱ्यांनी घर गाठल्यानंतर चौघेही मृतावस्थेत आढळले. हा संदेश नेमका कोणत्या परिस्थितीत पाठवण्यात आला, त्यावेळी पुरणमल यांची मनःस्थिती काय होती आणि त्यापूर्वी किंवा त्यानंतर कोणाशी त्यांचा संपर्क झाला होता, याची माहिती पोलिस घेत आहेत.

मानसिक तणावावर उपचार घेत होते?

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पुरणमल गेल्या काही काळापासून मानसिक तणावात होते. त्यांनी नौदलाच्या आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात उपचार घेतले होते का, त्यासंदर्भातील वैद्यकीय नोंदी आणि औषधोपचार सुरू होते का, याचीही पडताळणी केली जात आहे. त्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि शेजाऱ्यांकडूनही माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news