मुंबई ः कुलाब्यातील महापालिकेच्या शाळा संकुलातील सी-1 शाळेची इमारत धोकादायक ठरवून रिकामी करण्यात आली आहे. तर सी-2 ही इमारत केवळ दुरूस्ती करण्याचे आदेश असताना अचानक धोकादायक ठरविण्यात आली आहे. त्यामुळे कुलाब्यातील महापालिकेची शाळा बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप राज्य शिक्षक परिषदेने केल आहे.
सी-2 ही इमारत नोव्हेंबर 2024 ला संबंधित अधिकार्यांनी दुरुस्ती करण्यासाठी पत्र दिले. तर 1 मे 2025 रोजी या इमारतीत मुले बसण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगण्यात आले. तर जून 2025 अखेरीस अचानक शाळा धोकादायक असल्याचे सांगत शाळाच बंद करण्यात आली. एकाच वेळी दोन्ही इमारती रिकाम्या केल्याने येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
गैरसोयीमुळे कुलाबा इंग्रजी प्राथमिक शाळेतील मुले 15 जुलै पासून शाळेत येत नाहीत. कारण बसण्यास जागा नाही. तब्बल 20 दिवस मुले शाळेवाचून भटकत असल्याचे समजते. 200 पालकांनी शाळा सोडल्याचे दाखले काढून घेऊन खासगी शाळेत प्रवेश घेतल्याने महापालिकेची ही शाळा प्रशासनाला बंद करायची आहे काय, असा सवाल राज्य शिक्षक परिषदेने केला आहे.
याबाबत परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर डिपार्टमेंट यांनी ही बाब मे महिन्यात केली असती तर सत्र सुरु झाल्यानंतर अचानक अशी समस्या उदभवली नसती. प्रशासनाने अचानक असा निर्णय घेतल्याने शाळेला जागा कोठे मिळणार किंवा एकदम इतर शाळेत प्रवेश कसा मिळणार ही मोठी समस्या असल्याने उच्च पदस्थ अधिकार्यांनी तत्काळ लक्ष घालण्याची गरज आहे.
या निर्णयामुळे सदर शाळेत शिकणार्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे याप्रकरणाकडे लक्ष देण्याचे आवाहन निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना केल्याचे दराडे यांनी सांगितले.
शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ अधिकारी शाळेसाठी तात्पुरती 3/4 वर्षे जागा मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. आदर्श इमारत, एमटीएनएल कुलाबा इमारत, या ठिकाणची रिकामी जागा, हुतात्मा चौकातील एका रिकाम्या इमारतीमध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र अद्याप यश आले नाही.
शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद