

नवी मुंबई : नारळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कमी केलेल्या उत्पादनामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली आहे. तसेच गोटा खोबरे आणि खोबरेल तेल कंपन्यांकडून मागणी वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या नारळाच्या भावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० ते ९० टक्क्यांनी वाढ झाली असून आवकही घटली आहे.
गणेशोत्सव सुरू असल्याने पूजा आणि तोरणासाठी नारळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत दर्जानुसार ४० ते ५० रुपयांवर पोहोचली आहे. अनियमित हवामानामुळे नारळाच्या उत्पादनात देशभरात तब्बल २५ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे नारळांच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याने ग्राहकांना नारळ महाग पडत आहे.
गणेशोत्सवात भक्तिभावाने भाविक गणरायाला तोरण अर्पण करतात. तोरणासाठी तमिळनाडूतील नारळाचा वापर केला जातो. यंदा नव्या नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. उत्सवाच्या कालावधीत पुणे येथे देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. खाद्यपदार्थ विक्रीत मोठी वाढ होते. हॉटेल व्यावसायिक, केटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे. सापसोल, मद्रास या जातीच्या नारळांचे खोबरे चवीला गोड असते. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळांना मागणी असते. अशा मुहूर्तावर ही दरवाढ झाली आहे.
देशभरात नारळाचे उत्पन्न ३० टक्क्यांनी घटले.
मागील वर्षात नारळाच्या निर्यातीत वाढ.
तेल उत्पादक कंपन्यांकडून मागणी जास्त.
अनेक शेतकऱ्यांनी नारळाच्या बागा काढून टाकल्या.
गोटा खोबऱ्याला प्रचंड मागणी.
सततच्या पावसामुळे नारळावर कीटकांचा प्रादुर्भाव.
येणाऱ्या सणांमुळे मागणीत प्रचंड वाढ.
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमधून नारळाला मागणी.
महाराष्ट्रात आंध्र प्रदेशातून पालकोल नारळाची, तर कर्नाटकातून सापसोल आणि मद्रास नारळाची बाजारात आवक होत आहे. तामिळनाडूमधून नवा नारळाची आवक होते.