

मुंबई : मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत जाणार्या कोस्टल रोडलगत वरळीत महाकाय पदपथ साकारण्यात आला असून अनेक उद्यानांच्या विकासासह पार्किंगही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेने येथे बायो टॉयलेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात आठ टॉयलेट लवकरच सुरू होणार आहेत.
कोस्टल रोड परिसरात तीन मोठी भूमिगत वाहनतळे उभारण्यात येत आहेत. रस्त्यालगत वरळी येथे भव्य पदपथही बनवला आहे. एक खुले नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय अनेक उद्यानही साकारणार आहेत. त्यामुळे येथे मुंबईकरांसह पर्यटकही मोठ्या संख्येने येणार आहेत. मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकरांचे आणखी एक हक्काचे ठिकाण बनणार आहे. त्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यालगत बायो टॉयलेट बांधण्यात येणार आहे. ठराविक अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हे अद्ययावत टॉयलेट असतील. दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा असणार असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.
बायो टॉयलेट काय आहे
बायो टॉयलेट पर्यावरणपूरक स्वच्छता प्रणाली आहे. ही प्रणाली मानवी विष्ठेचे विघटन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे जीवाणू (बॅक्टेरिया) वापरते. या प्रक्रियेत विष्ठेचे पाण्यात आणि वायूमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे कचर्याची विल्हेवाट सुरक्षितपणे होते. शौचालयातून कचरा फ्लश केल्यावर, तो एका बायो डायजेस्टर टाकीमध्ये जातो. या टाकीत विशिष्ट प्रकारचे जीवाणू (अॅनारोबिक व एरोबिक) असतात, जे मानवी विष्ठेचे विघटन करतात.