

मुंबई : उद्धव ठाकरेंकडून मतांसाठी आता लांगूनचालन करायचे असून, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर येथील माजी महापौर राशीद मामू यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत कठोर शब्दांत टीका केली. सायन येथील गुरुद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे वीर बाल दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य करत सध्याचे त्यांचे राजकारण मतांसाठी लांगूलचालनावर आधारित असल्याचा आरोप केला. फडणवीस म्हणाले, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून संबंधित नेत्यांचा विचार, दिशा आणि चारित्र्य स्पष्टपणे जनतेसमोर येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत, त्यांच्या सुपुत्राकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये राशीद खान मामू यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याचा संदर्भ देत फडणवीस यांनी हा निर्णय केवळ मतांचे लांगूलचालन करण्यासाठी असल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी आणखी आक्रमक शब्दांत सांगितले की, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आणि त्यातून मते मिळवायची, हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसा नाही. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवली जात असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, अशा राजकारणाला जनता भुलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशावर प्रेम करणारे, राष्ट्रनिष्ठ आणि विचारांशी प्रामाणिक असलेले नागरिक हे सर्व बारकाईने पाहात असल्याचे सांगत या प्रकारच्या राजकारणाची किंमत संबंधितांना मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.