

मुंबई : आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क महाराष्ट्रात राबवत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास आणि हवामान बदल प्रतिबंधासंदर्भातील उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अशा सर्व प्रकल्पांना राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले प्रिन्स रहीम आगा खान यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची येथील फेअरमाँट हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे स्वागत करत विविध विषयांवर चर्चा केली.
विविध सामाजिक विकास प्रकल्प, आरोग्य सुविधा, हवामान कृती, जलव्यवस्थापन, वारसा संवर्धन आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीन पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सचिव डॉ. राजेश गवांदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ग्रामीण भागात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने केलेल्या कार्याचे कौतुक केले. जलटंचाईग्रस्त भागांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे गावांमध्ये झालेला सकारात्मक बदल उल्लेखनीय असल्याचे सांगत, अशा प्रकल्पांचा विस्तार अधिक मोठ्या क्षेत्रात करण्यासाठी राज्य शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणाऱ्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्य शासन आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांच्यात सातत्यपूर्ण संवादासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली. या माध्यमातून विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यांचा विस्तार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवण्यात आली.
बैठकीत प्रस्तावित बालरुग्णालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जेरियाट्रिक रुग्णालय, पुनर्वसन केंद्र, कौशल्याधारित आरोग्यसेवा प्रशिक्षण, तसेच संशोधन सुविधांबाबतही चर्चा झाली. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने जेरियाट्रिक तज्ज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वागत केले. वृद्ध लोकसंख्येच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, अशा विशेष आरोग्य सुविधांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.