मुंबई : अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करते आहे की नाही ते बघा. प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करा. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. त्यामुळे सरसकटच पंचनामे करा. कुठेही नियमावर किंवा कायद्यावर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असे वागू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना रविवारी दिल्या.
पुढील दोन दिवस पावसाच्या द़ृष्टीने काळजीचे असून त्यानंतर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा विरळ होण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत कमीत कमी नुकसान होईल, अशा व्यवस्था उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी या आठ जिल्ह्यांसह सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत चर्चा केली. जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकार्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून विविध धरणांतून होणारा पाण्याचा विसर्ग, पुराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर हा पट्टा विरळ होत जाईल आणि परतीचा पाऊस असेल. त्यामुळे पुढचे दोन-तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल, अशाप्रकारची व्यवस्था उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना केल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेतली. राज्याच्या विविध भागातील धरणातील विसर्ग स्थितीचा आढावा घेतला. जलसंपदा विभागाने विसर्ग स्थितीबाबत स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करावे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. या विसर्गाचा अंदाज घेऊन जिथे पाणी शिरण्याची शक्यता आहे, त्या भागातील लोकांना सर्वात आधी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना केल्या. तसेच काही जिल्ह्यांत जनावराच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा टंचाई असलेल्या ठिकाणी तातडीने चारा पुरवण्याचेही आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बीड जिल्ह्यातील 17 धरणे शंभर टक्के भरली असून दोन धरणे 90 टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात येत आहे. वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे 48 मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आष्टीमधून 60 नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे. सप्टेंबरपासून 2 हजार 567 कुटुंबांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागले. 10 लोकांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी 8 कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील 36 गावांचा संपर्क तुटला होता. मागील दोन दिवसांत 17 गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. एक हजार 386 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पावसाने आतापर्यंत सहाजणांच्या मृत्यूची नोंद झाली असून या सर्वांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. जनावरांचे मृत्यू झालेल्यांनासुद्धा आर्थिक मदत देण्यात आली असून 203 घरांचे नुकसान झालेल्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यात सहा गावांचा संपर्क तुटला असून 3 हजार 615 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 88 घरांची पडझड झाली असून त्यांना तातडीने मदत देण्यास सांगण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निवडी, उदगीर, चाकूर, रेणापूर, जळकोट आदी भागात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 500 हून अधिक नागरिकांना मदत शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे. एकूण 60 रस्ते किंवा पूल पाण्याखाली होते. ते आता वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असली तरी एनडीआरएफ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.