

Maharashtra legislature Chief Justice Bhushan Gavai
मुंबई : या सत्काराचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. माझा हा सत्कार महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेने केल्याचे मी समजतो. विधीमंडळाचे आणि माझ्या वडिलांचे ३० वर्षांपासून नाते आहे. याच विधीमंडळाने माझा केलेला सत्कार 'न भुतो न भविष्यती' असा आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
विधीमंडळात आज (दि. ८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. सरन्यायाधीश गवई यांनी महाराष्ट्र गीताच्या ओव्या गाऊन आपल्या भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले की, राजकीय, सामाजिक मतभेद बाजू ठेवून देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनी एक झाले पाहिजे.
मी नेहमीच भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थी स्वतःला समजत आलो आहे. राज्य घटना मी १० वी मध्ये असताना माझ्यात मनात रुजली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. ते म्हणायचे की मी पहिला आणि शेवटचा भारतीय आहे. आपला देश एकसंघ ठेवायचा असेल, तर वन नेशन वन सिटीझन हे धोरण ठेवायला पाहिजे. फेड्रॅलिजम जर आपण आणतोय तर ते फ्लेक्सिबल असले पाहिजे. म्हणून जेव्हा केव्हा हा देश एकसंघ कसा राहील, यासाठी घटनेत प्रोव्हिजन केले आहे. भारतीय राज्य घटनेचे तीन स्तंभ आहेत. विधिपालिका, न्याय पालिका आणि कायदेपालिका. घटनेत कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी विधीमंडळाची आहे, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर होते. तेव्हा नागरिकांना बेघर होण्यापासून वाचवले. त्याचा जो आनंद असतो, तो कोणत्याही शब्दांत उल्लेख करता येणार नाही. मला आनंद आहे की माझ्या २२ वर्षांच्या कालखंडात एक चांगले न्यायदान करण्याचे काम करता आले. आज आपण सर्वांनी माझा बहुमान केला. हा जो बहुमान आहे, तो एक आशीर्वाद आहे. मी या भूमीला आणि सर्व जनतेला वंदन करतो.
मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देशा
प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या राज्याचे सुपुत्र असलेले भूषण गवई हे देशाचे सर न्यायाधीश झाले, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. दादासाहेब गवई यांचा विधिमंडळाशी वेगळा संबंध होता. समाजातील प्रत्येक व्यक्तीला दादा साहेब यांच्याकडे जाता येत होते.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यामध्ये साधेपणा आहे. मानवता आणि संवेदनशीलता हा त्यांच्या स्वभावातील गुण आहे. एखाद्या प्रश्नातून मार्ग कसा काढावा, हे त्यांच्याकडून शिकावे. कधीही त्यांनी सुट्टी घेतल्याचे दिसले नाही. गवई यांची कारकिर्द मी जवळून बघितलेली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीश गवई यांचे तोंडभरून कौतुक केले.