

मुंंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्द सुरू झाल्यानंतर सर्वत्र तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठिकाणी केव्हाही ब्लॅकआऊट केला जावू शकतो. अशावेळी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करा, रुग्णालयांसोबत समन्वय साधा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि प्रशासन यंत्रणेच्या शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत केल्या आहेत.
ब्लॅकआऊटवेळी रुग्णालयांसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. रुग्णालयांवर हल्ले होऊ नयेत म्हणून लाईट बंद केले जातात, अशावेळी पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापराव्यात जेणेकरून बाहेरून प्र्रकाश दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.
पोलीस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन आणि गस्त अधिक चोख करावी.
प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करावी. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करावी.
शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्यावे.
सैन्याच्या तयारी संबंधित हालचालींचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत.
सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्यावेत.