मुंबईत लाखाच्या क्षमतेचे स्टेडियम उभारु

‘वानखेडे’वरील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
cm-fadnavis-announces-one-lakh-capacity-stadium-in-mumbai
वानखेडेवर रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावे स्टँड उभारण्यात आले असून, त्यांचे अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस. Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : भविष्यात मुंबईमध्ये वानखेडेपेक्षा मोठे स्टेडियम उभारण्यासाठी जागा आम्ही उपलब्ध करून देऊ, जिथे एक लाख प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव द्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुचवले. वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मा स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार स्टँड नामकरण सोहळा शुक्रवारी मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, रोहित शर्मा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप आणि पदाधिकारी तसेच मुंबई इंडियन्सचे खेळाडू उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी एक काळ गाजवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईसह भारताचे नाव उज्ज्वल करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, क्रिकेट खेळत असताना एखाद्या खेळाडूचे नाव स्टँडला नाव मिळणे, ही अभिमानाची बाब आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे. रोहित यासाठी खर्‍या अर्थाने पात्र आहे. चांगले खेळाडू निवृत्त व्हावेत, असे आपल्याला कधी वाटतच नाही. या सन्मानानंतर रोहित अधिक चांगले आणि अधिक काळ खेळेल, असा विश्वास वाटतो. यापुढे वानखेडे स्टेडियमवर खेळताना त्याने मारलेला चेंडू रोहित शर्मा स्टँडला जाऊन केव्हा लागतो, याची आम्हा सर्वांनाच उत्सुकता आहे, असे फडणवीस म्हणाले.

एमसीएचे माजी अध्यक्ष दिवंगत अमोल काळे यांचे स्मरण करताना, माझे मित्र अमोल काळे यांनी एमसीएमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांचे अकाली निधन झाले. मात्र, त्यांनी पाहिलेले स्वप्न एमसीए नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या क्रिकेटमधील योगदानाचा उल्लेख करताना त्यांचे भरभरून कौतुक केले. शरद पवार यांच्याबद्दल मी सांगण्याची आवश्यकता नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल. एमसीए, बीसीसीआय किंवा आयसीसीमध्ये शरद पवार यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे एमसीएने शरद पवार यांच्या नावाचे स्टँड उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो, असे फडणवीस म्हणाले. अमोल काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एमसीएने एमसीए लाउंजला त्यांचे नाव दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news