

Housing Scheme for Dabbawala In Mumbai CM Devendra Fadnavis
मुंबई : डबेवाल्यांसाठी साडेपंचवीस लाखांत 500 चौरस फुटांचे घर दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वांद्रे पश्चिम येथे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी मंत्री आशिष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय, योगेश सागर, तमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे त्रिपाठी यांचे, तसेच नफा न घेता उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. मुंबईच्या डबेवाल्यांचे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहणे हा मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. गिरणी कामगार, बीडीडी चाळ, धारावी, कामाठीपुरा येथील रहिवासी तसेच कोळी बांधव, पदपथावरील विक्रेते यांसारख्या विविध घटकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहनिर्माण व पुनर्विकासाची कामे मार्गी लावल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार श्रीकांत भारतीय यांनी जगातले 27 विद्यापीठे संशोधन करीत असलेल्या डबेवाल्यांच्या संस्कृतीची माहिती देणार्या आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगून त्यांची पुढची पिढीच या केंद्राचे संचालन करणार असल्याची माहिती दिली. प्रारंभी डबेवाला असोसिएशनचे सचिव किरण गवांदे यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या 135 वर्षांच्या परंपरेची माहिती देऊन कोविड काळात काम ठप्प असताना नागरिकांनी केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 135 वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे. ‘डबेवाला भवन’चे रूपांतर आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात झाल्यामुळे आणि येथे व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून लोकल प्रवास, डबे वितरित करणे आणि जेवणापर्यंत असा डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.