

मुंबई : नाशिकमधील टीसीएस आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. धर्मांतरासारखे प्रकरण अजिबात खपवून घेऊ नका. या प्रकरणातील सर्व संभाव्य पॅटर्न आणि अँगल्स तपासले जावेत, कोणताही मुद्दा दुर्लक्षित राहू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकार्यांना दिले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि संवेदनशील प्रकरणांच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी वर्षा निवासस्थानी गृह विभागाची बैठक घेतली. यावेळी पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
नाशिकमधील धर्मांतर प्रकरण, अशोक खरात प्रकरण, अमरावतीतील घटना आणि गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणांचा सविस्तर आढावा घेत संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये कोणतीही ढिलाई चालणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तपासात पारदर्शकता, वेग आणि ठोस पुरावे यावर भर देत सर्व प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई सुनिश्चित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
खरात प्रकरणी भक्कम पुरावे जमा करा
अशोक खरात प्रकरणातील तपासाबाबत मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली. या प्रकरणातील पिडितांना विश्वास द्या, असे सांगतानाच कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. ‘तपास हा कायदेशीरद़ृष्ट्या भक्कम असावा. न्यायालयात केस मजबूत राहण्यासाठी ठोस आणि भक्कम पुरावे गोळा करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले.
ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश करा
गोरेगाव येथील नेस्को मैदानात झालेल्या कार्यक्रमात अमली पदार्थाचे अतिसेवन केल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ही बाब थेट तरुणाईच्या भविष्याशी संबंधित असल्याने अशा गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहून कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले. ड्रग्ज नेटवर्कचा पूर्णतः पर्दाफाश करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.