

मुंबई : आम्ही केलेल्या कामाची जिवंत स्मारके सगळ्या मुंबईत पाहायला मिळतात. ‘करून दाखविले’चे बोर्ड लावायची आम्हाला गरज नाही. फक्त पायाभूत सुविधांची कामे करायची नाहीत तर गोरगरीब, मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनात बदल घडवायचा आहे. त्यासाठी मुंबईकरांचा आशीर्वाद मागायला आलो आहे. मुंबई बदलून दाखविली आहे, मुंबईकरांचे जीवनही बदलून दाखवू हे वचन देण्यासाठी महायुती इथे आली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत महायुतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
मुंबईकरांच्या घरांचा आणि दळणवळणाचा प्रश्न सोडवितानाच आम्हाला मुंबई सुरक्षित करायची आहे. त्यासाठी बांगला देशी घुसखोरांना हुसकावून लावू तसेच पर्यावरणपूरक मुंबईसाठी 17 हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी वरळी येथील एनएससीआय डोम सभागृहात महायुतीचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री आरपीआयचे रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, यांच्यासह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार, आमदार उपस्थित होते. या पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने महायुतीने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
मराठी माणूस हद्दपार कोणामुळे झाला? तुम्ही सांगता मुंबई पालिकेत आम्ही 70 हजार कोटींच्या ठेवी जमा केल्या. ज्यावेळी गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर जात होता, त्यावेळेस 70 हजार कोटीतले 2-3 हजार कोटी खर्च केले असते, तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईत हक्काचे घर मिळाले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दोन भाऊ एकत्र आले, आता तुमचे कसे होणार ? असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. त्यांना मला सांगायचे आहे, ‘देखकर धुंदली ताकद, हौसला हमारा कम नही होता; अरे झुठी आंधीयोंसे वहीं डरते हैं, जिनके चिरागो मैं दम नहीं होता !’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुंबईत शिरलेले बांगला देशी गेल्या सात-आठ महिन्यांत बर्याच प्रमाणात परत पाठवले. पुढच्या काळात मुंबईत त्या ममता दीदींच्या आशीर्वादाने आलेला एक एक बांगला देशी शोधून काढून, त्याला परत पाठवू. सुरक्षित मुंबई आम्हाला तयार करायची आहे.
शिवसेना - भाजप युतीची सभा ही मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील उठावाची ललकार सभा आहे. गेल्या एवढ्या वर्षांपासून मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती. या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडवायचे आहे आणि बकासुराच्या तावडीतून मुंबई मुक्त करायची आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला.