मुंबईत बिल्डरशिवाय इमारतीचा पुनर्विकास करता येतो आणि या स्वयंपुनर्विकासात मराठी माणसाला मुंबईसारख्या महानगरात मोठे घर मिळू शकते, याचा दाखला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्माण केला. स्वयंपुनर्विकास योजनेला देवेंद्रजींनी राजाश्रय दिला. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातील महानगरांमधील मराठी माणूस आता या योजनेकडे विश्वासाने पाहू लागला आहे. कारण, गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार खुद्द देवेंद्रजी आहेत आणि महाराष्ट्र जसा आता थांबणार नाही, तसाच गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास थांबणार नाही, याबद्दल कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही.
आज 22 जुलै रोजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्म दिवस आहे. साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचं त्यांनी ठरवलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हारतुरे, पुष्पगुच्छ या सोपस्कारात न पडता, समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, अशा त्यांच्या सूचना आहेत. आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. पण त्यांच्या सूचनेचे पालन करत माझ्या शुभेच्छा मी या लेखातून देण्याचा प्रयत्न करतो आहे. मी देवेंद्रजींचे मनापासून अभीष्टचिंतन करतो.
मी मनसेचा आमदार म्हणून विधानसभेत आलो,त्यावेळी देवेंद्रजींची आणि माझी कामकाजाच्या निमित्ताने जवळून ओळख झाली. तसं पाहिलं तर मी पहिल्यांदाच आमदार झालो होतो, विधिमंडळाच्या कामकाजाचा तसा अनुभव नव्हता. विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी म्हणून विविध व्यासपीठांवर भाषणं करण्याची सवय होती. पण विधिमंडळातील कामकाज नियमात बसवून करावं लागतं, वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा वापर करत, प्रश्न मांडायचे असतात. सुरुवातीच्या काळात देवेंद्रजींचं विधिमंडळातील कामकाज मी पाहात होतो, अभ्यासपूर्ण मांडणी, प्रश्नांचा अभ्यास, विविध आयुधांचा अचूक वापर आणि जनतेचे प्रश्न सुटण्यासाठीची त्यांची कळकळ जवळून अभ्यासायला मिळाली.
अनेकवेळा एखादा मुद्दा सभागृहात मांडण्यापूर्वी, चर्चेत भाषण करण्यापूर्वी मी देवेंद्रजींचं मार्गदर्शन घ्यायचो, आयुधांचं महत्त्व आणि त्याची मांडणी समजावून घ्यायचो. यामधून हळूहळू आमचा स्नेह वृध्दिंगत होत गेला. राजकीय जीवनात कधी कधी स्थित्यंतर अपरिहार्य ठरतात. खरं तर तो काळ फार आव्हानात्मक असतो. पण या काळात या आव्हानांवर मात करण्याची ताकद देणारा नेता आयुष्यात आला तर हे स्थित्यंतर संधी निर्माण करतं. मला आठवतं, जेव्हा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडायचं ठरवलं आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय घोषित केला. मेळाव्यातून बाहेर पडलो, गाडीत बसल्यानंतर पहिला फोन देवेंद्रजींना केला होता.
आपल्यासोबत काम करण्याची इच्छा देवेंद्रजींकडे व्यक्त केली होती; परंतु त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी घाई न करण्याचा, सबुरीचा सल्ला मला दिला. मी पुन्हा विनंती केल्यावर त्यांनी मला एअरपोर्टला व्हीआयपी गेटवरील लाऊंजमध्ये भेटण्यास सांगितलं. ते नागपूरला निघाले होते. तिथे बाहेरच्या पॅसेजमध्ये त्यांची आणि माझी भेट झाली. लहान भावासारखं, मित्रासारखं खांद्यावर हात ठेवत अर्धा तास त्यांनी माझ्याशी संवाद साधला. भाजपात येण्यासाठी अर्थातच माझ्या काहीही अटी-शर्ती नव्हत्या. मी एवढीच विनंती त्यांना केली होती की, माझ्या कामाचा सन्मान होईल, एवढी काळजी घ्यावी. त्यावेळी त्यांनी माझ्याशी केलेलं हितगुज माझ्या स्थित्यंतराच्या आव्हानात्मक काळात मला लाख मोलाचा आधार देऊन गेलं.
खरं तर पुढच्या दोन दिवसांत देवेंद्रजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार होते. त्या घाईगडबडीत नागपूरला निघाले होते. मुख्यमंत्रिपदाची संधी मिळालेल्या नेत्याची त्या काळातील मन:स्थिती काय असेल, याची आपण सहज कल्पना करू शकतो. पण देवेंद्रजी डाऊन टू अर्थ होते. कुठलाही अहंभाव, आविर्भाव त्यांच्या बोलण्यात आणि देहबोलीत मला जाणवला नाही. त्यांनी सन्मानाने मला पक्षात घेतलं, संघटनेचं काम दिलं, न मागता विधान परिषदेत आमदारकी दिली, त्याही पुढे जाऊन विधान परिषदेच्या महत्त्वाच्या विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारीही दिली.
मी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असताना देवेंद्रजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर अंकुश कसा ठेवायचा असतो, हे महाराष्ट्राने देवेंद्रजींच्या रुपात पाहिलंय. ते निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि हात स्वच्छ असल्यानेच विरोधी पक्षनेत्याची भूमिका बिनदिक्कतपणे पार पाडू शकले. विरोधी पक्षनेता म्हणून मी राज्यभर त्यांच्याबरोबर फिरलो. कोविड, अतिवृष्टी, निसर्ग आणि तोक्ते वादळ या नैसर्गिक आपत्तीच्या काळात विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी कशी पार पाडली पाहिजे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. त्यावेळी त्यांच्यातील शेतकर्यांप्रती, सर्वसामान्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि आस्था मला जवळून अनुभवता आली.
आम्ही दोघेही अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी दौर्यावर होतो. नदीतून, शेतातून, चिखल तुडवत देवेंद्रजी फिरत होते, आपद्ग्रस्तांशी संवाद साधत होते, त्यांना आधार देत होते. त्याचवेळी माननीय उद्धवजी ठाकरेही सोलापूर दौर्यावर आले होते. रेडकार्पेट टाकलेल्या स्टेजवरून शेतकर्यांना चेक वाटत होते. एका बाजूला शेतकर्यांचं दुःख जवळून जाणून घेण्यासाठी चिखल तुडवणारे देवेंद्रजी होते आणि आलिशान रेडकार्पेटवरचे कार्यक्रम घेणारे उद्धवजी होते. हे दोन्ही फोटो माध्यमांनी त्यावेळी व्हायरल केले होते.
एखाद्या सामाजिक कामाच्या पाठीशी नेत्याने उभं राहणं म्हणजे काय असतं, याचे अनेक अनुभव माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतले आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास कर्ज योजना आणण्यासाठी मी पुढाकार घेतला, पण बँकेने रिअल इस्टेटला कर्ज देण्यापासून आरबीआयने बंदी घातली. बँकेच्या भरवशावर स्वयंपुनर्विकासासाठी लोकांनी इमारती पाडल्या होत्या, त्यांना जर कर्ज मिळालं नाही, तर ही सर्वसामान्य कुटुंबं देशोधडीला लागणार होती. तेव्हा मी देवेंद्रजींना ही अडचण सांगितली, त्यांना विनंती केली. त्यांनी सर्व प्रश्न अगदी बारकाईने समजून घेतला आणि आरबीआयचे गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास यांना भेटण्याचा निर्णय घेतला. मला घेऊन त्यांनी त्यांची भेट घेतली, बँक रिअल इस्टेटला कर्ज देत नसून बँकेचे सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांना कर्ज देत आहे, यात कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार नसतो, सर्व लाभ गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना मिळत असतो, हे त्यांच्या कौशल्याने गव्हर्नरना पटवून देण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्यामुळे ही योजना देशपातळीवर घेऊन जाण्याचा निर्णय आरबीआयने घेतला. स्वयंपुनर्विकासाची प्रगती, त्याला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि समस्या मी सातत्याने देवेंद्रजींच्या कानावर टाकत होतो. त्यातून त्यांनी स्वयंपुनर्विकासासाठी आमच्या 18 मागण्यांपैकी 16 मागण्या मान्य करून त्याचे शासन निर्णयदेखील काढले.
चारकोपला ‘चारकोप-श्वेतांबरा’ हा आमचा स्वयंपुनर्विकासाचा प्रकल्प पूर्ण झाला होता, सभासदांना चावीवाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. आपण आलात तर स्वयंपुनर्विकास भविष्यात जनआंदोलन म्हणून पुढे येईल, या कार्यक्रमाला आपण यावे, अशी विनंती मी देवेंद्रजींना केली. प्रचंड धावपळीच्या कार्यक्रमातूनही ते या कार्यक्रमाला आले, सभासदांना चावीवाटप केलं. नवनिर्मित इमारतींमधील सदनिकांची बारकाईने पाहणी केली, उत्तम प्रकल्प साकारल्याबद्दल कौतुक केलं, पाठीवर हातही ठेवला!
या कार्यक्रमात अनेकांना त्यांच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाचंही दर्शन झालं. त्यांनी हा आग्रह धरला की, स्वयंपुनर्विकास ही अतिशय उत्तम संकल्पना आहे, त्यासाठी सरकार सर्व पाठबळ देईलच, पण समूह स्वयंपुनर्विकासासाठी पुढाकार घ्या. समूह स्वयंपुनर्विकास केला तर दोन-तीन सोसायट्या एकत्र येतील, मोठी जागा मिळेल, त्यात तुम्ही त्यांना बागबगिचा, खेळाचे मैदान, ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा, पार्किंग, व्यायामाच्या सोयी उपलब्ध करून देऊ शकाल. स्वयंपुनर्विकासातील सर्व समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, त्याबाबतचा आणखी अभ्यास झाला पाहिजे, यासाठी त्यांनी केवळ आशीर्वादच दिले नाहीत, तर चारकोपच्याच कार्यक्रमात माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर अभ्यासगटाची स्थापनाही केली.
राज्यभर फिरून अभ्यासगटाचा अहवाल अभ्यासगटाच्या वतीने मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना सादर केला. अनेक अहवाल येतात, पण त्यावर कार्यवाही होत नाही. पण देवेंद्रजींनी त्याच ठिकाणी मानननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे, सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील आणि इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत संबंधित विभागांनी शिफारशींवर तातडीने आपले अभिप्राय नोंदवून मंत्रिमंडळासमोर यावे आणि पुढील हिवाळी अधिवेशनात यावरील अॅक्शन टेकन रिपोर्ट आम्ही सादर करू, असाही विश्वास आम्हाला दिला. अशाप्रकारे देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारचे काम अतिशय गतीने होत आहे, त्यामुळे जसा महाराष्ट्र आता थांबणार नाही, तसाच गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास थांबणार नाही, याबद्दल कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही.आज स्वयंपुनर्विकासाला जी गती मिळाली आहे, लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे, त्याचे सारे श्रेय केवळ देवेंद्रजींचे आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सरकारने आणली. मुंबई बँकेने हजारो लाडक्या बहिणींची झीरो बॅलन्स खाती उघडण्यासाठी पुढाकार घेतला. पण या महिलांनी केवळ 1500 रुपये घेण्यावर समाधान न मानता त्यातून छोटा-मोठा व्यवसाय उभा करावा, आपल्या पायावर उभं राहावं, हा विचार घेऊन मी शासनाच्या चार महामंडळांशी, जी महामंडळे महिलांना व्याज परतावा देतात, अशा महामंडळांच्या योजनांची सांगड मुंबई बँकेच्या महिलांसाठीच्या कर्ज योजनांशी घालण्याची विनंती केली. देवेंद्रजींना ही संकल्पना भावली. त्यांनी बैठक घेतली आणि या चार महामंडळांच्या व्याजपरतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या महिला योजनेशी घालण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचे व्हीजनरी काम महाराष्ट्राने पाहिलंय. सत्तांतरात त्यांची मोठी भूमिका होती, हे मी सांगण्याची गरज नाही. मला जे वाटतं, त्यानुसार त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. सत्तेबाहेर राहून सरकारशी समन्वय साधत काम करायचं होतं. परंतु, पक्षादेश येताच आपल्या इच्छेपेक्षाही पक्ष कार्यकर्त्यांचं हित आणि नेतृत्वाचा आदेश त्यांनी शिरसावंद्य मानला. ‘मी पुन्हा येईन’ म्हणून त्यांना अनेकांनी हिणवलं, पण ते उद्विग्न झाले नाहीत, त्यांनी प्रतिकार केला नाही, पण पुढील काळात कठोर परिश्रमातून पुन्हा आले, हाही इतिहास सर्वांना माहीत आहे.संयम ही देवेंद्रजींची मोठी ताकद आहे. मराठा आंदोलनाच्या वेळी अनेकांनी एकांगी टीका केली, खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले.सौ. अमृता वहिनींवरून, आईवरून गलिच्छ शेरोशायरी केली, त्यांच्या देहबोलीवर टीका केली. देवेंद्रजींनी सहनशिलता बाळगली, अशा आरोपांना उत्तरं देण्यात वेळ खर्च न करता मराठा आरक्षणासाठी जे जे करता येणं शक्य होतं, ते सर्व काही केलं.
आंदोलनाच्या कालावधीत त्यांचा कमालीचा संयम मी पाहिला आहे. ज्या नेत्याने मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टात ते टिकवलं, सर्वोच्च न्यायालयात आजही फेटाळलं गेलेलं नाही. अशा प्रामाणिक प्रयत्न करणार्या देवेंद्रजींना दोषी ठरवण्याचा राजकीय प्रयत्न झाला. परंतु, संयम ठेऊन आपण बावनकशी सोनं असल्याचं त्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलेलं आहे. ज्या उद्धवजींच्या काळात आरक्षण टिकवण्याकडे दुर्लक्ष झालं, त्यांच्यावर टीकाटिप्पणी नाही, पण केवळ देवेंद्रजी ब्राह्मण आहेत, हा पोटशूळ काही राजकीय विरोधी नेतृत्वाला होता, तो या आंदोलनाच्या आडून दिसून आला.
मी मुंबई बँकेचा अध्यक्ष असल्याने साखर कारखान्यांना व इतर कर्ज देण्याकरिता देवेंद्रजींच्या शिफारशी घेऊन गरजू यायचे. कारण, त्यांना माहीत होतं की, देवेंद्रजींचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम असतो. पण, त्यांनी मला नियम तोडून काही कर, असं कधीही सांगितलं नाही. देवेंद्रजींची एखादी कृती ही दीर्घकालीन परिणाम करणारी असते. कदाचित तत्क्षणी आपल्याला पटत नसेल किंवा चुकीची वाटेल. पण नंतर ती योग्य होती, असं उमजतं.
देवेंद्रजींचा विश्वास मिळवणं तसं सोपं मुळीच नाही. विनाकारण चापलुसी करणं त्यांना आवडत नाही. उलटपक्षी प्रामाणिकपणे, निष्ठेने, रचनात्मक काम करणारा कार्यकर्ता नेहमी त्यांच्या आवडीचा ठरतो, याचा मला स्वत:ला अनुभव आहे. एखादं पद मिळालं नाही तरी त्यांचा आपलेपणा व प्रेम त्या कार्यकर्त्याची नाराजी किंवा दुःख विसरायला भाग पाडते. दुसर्या बाजूला कामाचा व्याप असल्याने चिडचिड होणे, हा मनुष्यस्वभाव आहे; पण आपण कितीही थकलो असलो तरी कार्यकर्ता व लोकप्रतिनिधींना आपला थकवा न दाखवता ते कार्यरत राहिलेले अनेकदा पाहिले आहे. राज्याचा मुख्यमंत्री असताना तातडीच्या मदतीची गरज लागली, कोणावर अन्याय झाला तर त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याकडे त्यांचा कल असतो. बघतो, करतो, हा आविर्भाव त्यांचा कधीच नसतो.
कांदिवली येथील घाडगे ट्रॅव्हल्सचे मालक, जे वारकरी कुटुंब आहे, त्यांची जागा हडपण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचं मी त्यांच्या कानावर घातल्यानंतर शासकीय यंत्रणेला तंबी देऊन त्या दाम्पत्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. बांधकाम क्षेत्रातील माझ्या मित्राची जागा बळकावण्याचा काही भूमाफिया प्रयत्न करत होते, त्यांनी पोलिसांना सांगून अतिक्रमित केलेली जागा पहाटेपर्यंत मोकळी करून दिली. पुण्याचे माजी आमदार, माझे मित्र, दीपक पायगुडे हा लोकसेवा बँक प्रकरणात अडचणीत आला. त्याने कुठलाही भ्रष्टाचार केला नव्हता, अनियमितता झाल्यावरून पोलीस कारवाईसाठी आले होते.
योगायोगाने त्यावेळी मी देवेंद्रजींसोबत गाडीतून प्रवास करत होतो. दीपक चांगला समाजसेवक आहे, पोलीस त्याच्या घराबाहेर आहेत, चूक नसताना अटक होऊ शकते, हे लक्षात आणून दिल्यानंतर तत्काळ पुणे पोलीस आयुक्तांना फोनवरून योग्य त्या सूचना दिल्या आणि अवाजवी कारवाई रोखली. आज दीपक नेहमी म्हणतो, अटक झाली असती तर आजपर्यंत कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा एका क्षणात मातीमोल झाली असती. नावाप्रमाणे देवेंद्रजी देवासारखे धावून आले. त्यांचे ऋण मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.
आपला माणूस चुकला तर त्याला समज देणार्या देवेद्रजींनाही मी पाहिलं आहे. पण नंतर त्याला कसं वागावं, याचं मार्गदर्शनही ते करतात. दोन नेत्यांचे, दोन कार्यकर्त्यांचे मतभेद असले तरी देवेंद्रजींना ते मानणारे असतात. दोन्ही गटाला समाधान देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांचा एक आदरयुक्त दरारा त्यांना मानणार्यांमध्ये नेहमीच असतो. त्यामुळे बदल्या, चुकीच्या अधिकार्याची किंवा कामाची शिफारस करण्याची त्यांना मानणार्यांमध्ये कधी हिंमतही होत नाही. उलटपक्षी जनहिताची कितीही कामं तुम्ही घेऊन गेला तर ते कधी नाही म्हणत नाहीत.
विकासाची दृष्टी, प्रशासनावर पकड, बजेटचा अभ्यास, सुनियोजन, प्रचंड मेहनत, झपाटलेपण अनेक प्रसंगातून मी पाहिलंय. मुख्यमंत्री असताना निवडणूकपूर्व त्यांचा झंझावाती दौरा हा भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश देणारा ठरला. देवेंद्रजी कुणाच्या अंगावर जात नाहीत, पण कुणी अंगावर आलं, तर तितक्याच आक्रमकतेने जशाच तसं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. विधान परिषदेत नारायण राणेंनी टोकाची टीका केल्यावर दिलेलं उत्तर, नालासोपार्यातील सभेत प्रस्थापितांना दिलेला आवाज, डोंबिवलीच्या महापालिका निवडणुकीमध्ये विरोधकांच्या त्या टीकेला दिलेल्या सडेतोड उत्तरातूनही त्यांची निर्भीडता दिसून येते. परंतु, म्हणून ते त्यांचे दुश्मन होत नाहीत. कारण ती त्यांची राजकीय भूमिका असते. टीका केल्यानंतर त्यांचे आजही उत्तम संबंध आहेत.
कुटुंबवत्सल देवेंद्रजी व्यस्त कार्यक्रमातूनही आईची सेवा, आईशी गप्पा मारणं, त्या गप्पांमध्ये रंगतात. त्यांच्यासोबत जेव्हा भोजन करण्याचा योग आला, तेव्हा मायलेकांचं नातं किती घट्ट आहे, याची प्रचिती येते. वहिनींचाही आपलेपणा दिसून येतो. जेव्हा कधी लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्त्यांना बैठकीनंतर जेवण असते, तेव्हा वहिनी स्वत: आपलेपणाने विचारपूस करतात, स्वतः लक्ष ठेवून वाढतात. देवेंद्रजींची कन्या लहान आहे, पण वडील मुख्यमंत्री असल्याचा तिच्या चेहर्यावर भाव दिसला नाही.
कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे, निष्ठावान नेत्यांना, तरुणांना शक्य तेवढी संधी देण्याकडे देवेंद्रजींचा कल असतो. जनसुराज्य पक्षाचे नेते श्री. विनय कोरे भाजपशी जोडले गेले, त्यांना मंत्रिपद अपेक्षित होतं. परंतु, राजकीय अॅडजस्टमेंटमध्ये ते जमलं नाही. पण त्यांचं देवेंद्रजींवरील प्रेम व विश्वास तसूभरही ढळला नाही. त्यामुळे चांगली माणसं देवेंद्रजींच्या एकदा जवळ आली की, मग पद मिळो, न मिळो, ते कायम त्यांच्यासोबत राहतात.
राजकारणात किंवा आयुष्यात सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. हा भाव त्यांनी आमच्यावर बिंबवला आहे. निरपेक्ष भावनेने काम करण्याचा संस्कारही त्यांनीच दिलाय. त्यामुळे नाराज न होण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली आहे. विरोधी पक्षनेते अडचणीत असले तरी अनेकांना मदत केल्याचा मी साक्षीदार आहे. राजकीय विरोधक असले तरी सूड भावना न ठेवता मदत केल्याची अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना स्वतः अगोदर भाषण करायचे व उद्धवजींना शेवटी भाषण करण्याचा मान द्यायचा, हा मनाचा मोठेपणाही त्यांच्याकडे आहे. माथाडी नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी मेळाव्यात मी हे स्वतः व्यासपीठावर असताना पाहिले.
अनेक विरोधकांनी त्यांना टोमणे मारले, टीका केली, आरोप केले; पण त्यांनी संबंध बिघडू दिले नाहीत, राग ठेवला नाही, उलटपक्षी सगळ्यांशी आपुलकीचे संबंध जपले. राज्याच्या विकासाच्या संदर्भात त्यांचा दृष्टिकोन आणि भविष्यातल्या संकल्पना यावर तपशीलवार लिहायला गेलो तर पुस्तकही अपुरे पडेल.
राज्याचे कर्तव्यकठोर मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंना अंत:करणापासून मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो, अशी ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.