Farmer Loan Waiver | ...म्हणून सर्वांनाच दोन लाखांपर्यंत कर्जमाफी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

Farmer loan waiver |
Farmer Loan Waiver | ...म्हणून सर्वांनाच दोन लाखांपर्यंत कर्जमाफी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Published on
Updated on

मुंबई : आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्‍वाखालील विधिमंडळातील आमदारांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन २०१९ मध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी १ लाख रुपये तरी कर्जमाफीची रक्कम द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे आम्ही आकडेवारी मागितली, तर ९५ टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत होता; मग ५ टक्के शेतकऱ्यांना तरी का यातून वगळायचे, यासाठी आम्ही सर्वांना २ लाखांपर्यंतच्या रकमेची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रोत्साहनपर अनुदान मिळविण्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे पीक कर्ज भरण्याची अट या कर्जमाफीच्या निमित्ताने परदेशी समितीने ठेवली होती. पुन्हा कर्जमाफी देत असाल तर शेतकर्‍यांना काही रक्कम भरू द्या. यामुळे बँकिंग यंत्रणा चालेल; पण त्यासोबत बँकिंग यंत्रणेला काही शिस्त लावणे गरजेचे आहे, अशी शिफारस समितीने केली होती.

२०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना केली. या माध्यमातून जवळपास ४४ लाख शेतकऱ्यांना मदत केली. त्यानंतर २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आली. त्यावेळी २०१७ च्या योजनेमध्ये लाभ घेतलेल्यांना २०१९ च्या कर्जमुक्ती योजनेतून वगळण्यात आले. २००९ च्या कर्जमाफीत २००८ मध्ये कर्जमाफी घेतलेल्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमाफी न देता ५० हजारांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता, असेही फडणवीस म्हणाले. मात्र, सभागृहातील आमदारांच्या भावना आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन व्यापक विचाराने सरसकट २ लाखांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मागील ३ आर्थिक वर्षांतील दोन वर्षे ज्यांनी नियमित पीक कर्जाचे पैसे भरले आहेत, असे सर्व शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानाला पात्र असतील. कर्जमाफीव्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपये वीज बिलमाफीसाठी खर्च करत आहे. गेली तीन वर्षे आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदाने आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला, तर शेतकऱ्यांसाठी सरकार ९५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

कर्जमाफी योजना आणि लाभार्थी शेतकरी

2017 ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेचा लाभ ४४ लाख शेतकऱ्यांना झाला.

2019 ‘महात्मा ज्‍योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेचा लाभ ४६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना झाला. ही कर्जमाफी २५ हजार ४४९ कोटींची होती.

2026 शुक्रवारी जाहीर झालेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी’ योजना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची असून ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news