

मुंबई : देशाच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना अधिकाधिक पाठिंबा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केले. राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांना केल्याचे समजते.
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपच्या नेतृत्वातील रालोआने सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरविले आहे. दोन्ही आघाड्यांचे संसदेतील बलाबल पाहता सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपतिपदाचा मार्ग सोपा असल्याचे मानले जात आहे. मात्र तरीही राधाकृष्णन यांच्यासाठी अधिकाधिक मतांची बेगमी करण्याच्या उद्देशाने भाजप कामाला लागली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विशेष समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार फडणवीस यांनी काँग्रेस आघाडीतील विविध पक्षांच्या नेत्यांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक हळूहळू लक्षवेधी होत चालली आहे. अधिकाधिक मते मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. संजय राऊत यांनी ही माहिती दिली. मात्र अशा निवडणुकांच्या वेळी सर्वच फोन करत असतात, असेही ते म्हणाले.