

नवी मुंबई: नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती 10 टक्क्यांनी स्वस्त करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केल्यानंतर 14 डिसेंबर रोजी रविवारी सिडकोची 19,000 हजार घरांची महागृहनिर्माण लॉटरी जाहीर होत आहे.
नवी मुंबईत वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व कळंबोली आदी नोड्समध्ये सिडकोने बांधलेली ही 19,000 घरांची लॉटरी असेल. सिडकोच्या 19 फेब्रुवारी 2025 रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या,परंतु घरे परत (सरेंडर) केलेल्या अर्जदारांनादेखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे अधिक परवडणारी असतील. विशेषतः आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील घरखरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2.5 लाखांच्या अनुदानासोबतच राज्य सरकारने केलेल्या 10% कपातीचा एकत्रित लाभ मिळू शकेल.