मुंबई : ख्रिश्चन समाज, त्यांचे धर्मगुरुंविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याविरोधात राज्यातील ख्रिश्चन समाज शुक्रवारी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात एकवटला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना पाठिशी घालू नये. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्याची आमदारकी रद्द करावीत, अशी मागणी सकल ख्रिश्चन समाज बांधवांनी यावेळी केली. सकल ख्रिस्ती समाजाचे समन्वयक अॅड. सिरिल दारा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, कॉग्रेस खासदार प्रा.वर्षा गायकवाड, खासदार गोपाळ पाडवी, माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह अनेकांनी आमदार पडळकर यांचा खरपूस समाचार घेतला. आमदार जयंत पाटील म्हणाले, जाणूनबुजून टोकाची वक्तव्य करून समाज अशांत करण्याचे काम सुरु आहे. आज अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होत आहे. जाणूनबुजून ख्रिस्ती समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, आपण शांत राहतोय म्हणून आपल्यावर अन्याय होत आहे. केंद्र व राज्य सरकार द्वेष पसरण्याचे व जातीय ध्रुवीकरण करण्याचे काम करीत आहे. हे काम आमदार पडळकर व अॅड. गुणरत्न सदावर्ते करीत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.