

मुंबई : लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांच्या (एक्सेलेटर) वापरादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार, १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट किंवा एक्सेलेटरचा वापर करता येणार नाही. या मुलांसोबत पालक किंवा अन्य जबाबदार प्रौढ व्यक्ती असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र लिफ्ट, एक्सेलेटर अँड मुव्हिंग वॉक २०२६’ अंतर्गत हे नियम १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत.
नव्या नियमावलीनुसार, १२ वर्षांखालील मुलांना पालक किंवा जबाबदार प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीशिवाय लिफ्टमधून प्रवास करता येणार नाही. लिफ्ट आणि एक्सेलेटरच्या वापरावेळी मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, राज्य सरकारने लिफ्टच्या देखभाल आणि सुरक्षेबाबतही कठोर नियम केले आहेत. प्रत्येक लिफ्टची नियमित तपासणी आणि सर्व्हिसिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, वर्षातून किमान एकदा लिफ्टचे सुरक्षा ऑडिट करावे लागणार आहे. त्यामुळे लिफ्टमधील तांत्रिक त्रुटी वेळेत लक्षात येऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होईल.
लिफ्टमध्ये अपघात झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला २४ तासांच्या आत देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित इमारतीचे व्यवस्थापन किंवा जबाबदार व्यक्तींकडे याबाबत विचारणा केली जाणार आहे. या नव्या नियमांमुळे निवासी इमारती, व्यावसायिक संकुले आणि सार्वजनिक ठिकाणांवरील लिफ्टच्या वापरातील सुरक्षितता वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.