देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोजकुमार यांना श्रद्धांजली
Chief Minister Devendra Fadnavis pays tribute to Manoj Kumar
देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसFile Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

'शहीद' मध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि 'मेरे देश की धरती' सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या 'पुरब और पश्चिम' सारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. 'रोटी कपडा और मकान' सारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. उपकार, क्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, पटकथा-गीत लेखन, संकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत : उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि 'भारतकुमार' म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. 'दादासाहेब फाळके', 'पद्मश्री' पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.

त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news