

मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसमध्ये परत येण्याच्या बदल्यात आपल्याला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. आपण ही ऑफर नाकारत फुले, शाहू,डॉ. आंबेडकरांच्या विचारासाठी शरद पवार यांना साथ दिली. हा पक्ष वाढवला याचा मला आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, अजित पवार यांचे योगदान शब्दांत मांडता येणार नाही. रक्ताचे पाणी करून हा पक्ष वाढविणारे अजित पवार आज आपल्यात नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पक्ष नाही, तर ती संस्था आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे. अजितदादा आपल्यात नाहीत. ज्या निष्ठा आम्ही त्यांच्या चरणी वाहिल्या होत्या, आता त्या निष्ठा यापुढे कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या चरणी वाहायच्या आहेत.
खासदार सुनील तटकरे यांनी भाषणात भुजबळ यांचा 'कबड्डीपटू' म्हणून उल्लेख केला. त्यावर भुजबळांनी त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका. पक्षापेक्षा कोणी मोठे नाही. पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, तर तो कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे. त्यामुळे पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. पदे म्हणजे आळवावरचे पाणी असून ते कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही.
काँग्रेस फुटीनंतर शरद पवार यांचा पुतळा जाळण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रयत्न केला होता. वास्तविक, शरद पवार यांना काँग्रेसमधून काढण्यात आले. त्यावेळी हे प्रकरण त्यांना सहज मिटवता आले असते. पण तसे झाले नाही. त्यानंतर इतिहास घडला. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळी घड्याळ हे चिन्ह आपल्याला मिळाले. १९ मे १९९९ रोजी काही नेते मला भेटायला आले.
पवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्ते करत होते. झटापटीत आमचे सगळे कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले होते. तरीही आमच्या लोकांनी तो पुतळा जाळू दिला नाही. त्यावेळी ते जखमी झाले. ती घटना आजदेखील मला आठवते.
पक्षाच्या २७ वर्षांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल भुजबळ म्हणाले,
सफर मुश्किल था मगर हौसलों ने साथ निभाया. हर तूफान से लड़कर हमने कारवाँ बनाया।
ये विरासत यूँ ही नहीं मिली साथियों, कई लोगों ने अपना सब कुछ दांव पर लगाया ॥
या शायरीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा आजचा विस्तार हा अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या त्याग, संघर्ष व समर्पणातून घडला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पक्षाचा वर्धापन दिन हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने पक्षाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करणे आणि पक्ष मजबूत करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. पद हे क्षणिक असते, पण विचार अमर असतात. संघर्ष हा आपला वारसा, तर समर्पण ही आपली ओळख आहे. जनतेचा विश्वास हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे, असे भुजबळ यांनी आवाहन केले.