Chhagan Bhujbal | घरगुती गॅसला रॉकेलचा पर्याय; सरकारी तेल कंपन्यांच्या पंपावर होणार उपलब्ध

मंत्री छगन भुजबळ यांची विधान परिषदेत घोषणा
Chhagan Bhujbal |
Chhagan Bhujbal | घरगुती गॅसला रॉकेलचा पर्याय; सरकारी तेल कंपन्यांच्या पंपावर होणार उपलब्ध
Published on
Updated on

मुंबई : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅसवर परिणाम झाला असतानाच राज्य सरकारने यासंदर्भात चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. एपीजीचा मुबलक साठा असल्याचे केंद्र सरकारने कळविले असून, पुरवठा सुरळीत राहण्यासाठी रिफायनरीमधील दैनंदिन उत्पादन वाढविले असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिली. तर घरगुती गॅसला पर्याय म्हणून नागरिकांना रॉकेलचाही पुरवठा करणार केला जाणार आहे. सरकारी कंपन्यांच्या पंपावर हे रॉकेल उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा भुजबळ यांनी विधान परिषदेत केली. दरम्यान, एका महिन्यात घरगुती गॅसच्या दरात 60 रुपये तर व्यावसायिक गॅसच्या दरात 115 रुपयांची वाढ झाल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

विधान परिषदेत काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी नियम 93 अन्वये इराण व इस्राईल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती गॅसचे दर वाढविले गेल्याबाबत चर्चा उपस्थित केली होती. त्यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी निवेदनामार्फत सरकारची भूमिका स्पष्ट केली. बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार, या कंपन्यांनी राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन 9 हजार मेट्रिक टनावरून 11 हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविले आहे. असे सांगतानाच राज्यात रॉकेलचा भरपूर साठा आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही, असे निर्देश मध्यंतरी नागपूर उच्च न्यायालयाने दिले होते. त्यमुळे रॉकेल असूनही आपण ते देत नव्हतो. मात्र, सध्या अडचणीची परिस्थिती निर्माण झाली असल्याने लोकांना रॉकेल उपलब्ध करून द्यावे लागेल, असे न्यायालयाला कळविले आहे. जे डिलर्स पुढे येतील, त्यांच्यामार्फतही रॉकेल दिले जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र शासनाच्या आदेशानुसार 12 मार्च रोजी राज्यात 3 हजार 744 कि.ली. रॉकेलचे वाटप केल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

घरगुती गॅसला प्राधान्य

सध्याच्या गॅस टंचाईतून मार्ग काढण्यासाठी घरगुती गॅसच्या उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आल्याचे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले. यानंतर गॅस उरलाच तर रुग्णालये शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम, स्मशानभूमी, अनाथाश्रम यांना 100 टक्के दिले जाईल. संरक्षण क्षेत्र, सरकारी व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस, तुरुंग आणि एसटी महामंडळाच्या उपहारगृहांना 70 टक्के आणि औषण उद्योगासाठी, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन यांना एलपीजी वितरणात 50 टक्के प्राधान्य दिले असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

गॅस, खाद्यतेलांच्या किमतीत वाढ

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाचा गॅस आणि विविध तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत शेंगदाणा तेल 194.32 रुपये (पूर्वी 188.21 रु.), राईचे तेल 204.22 रुपये (पूर्वी 200.67 रु.), सोया तेल 159.32 रुपये (पूर्वी 153.63 रु.), सूर्यफूल तेल 178.05 रुपये (पूर्वी 172.16 रु.), पाम तेल 148.60 रुपये (पूर्वी 145.60 रु.) यांचे दर वाढले आहेत. तसेच केंद्र सरकारने 7 मार्च 2026 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असून, ती 852.50 रुपयांवरून 912.50 रुपये, तसेच व्यावसायिक सिलिंडरची किंमतही 1720.50 रुपयांवरून 1835 रुपये करण्यात आली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news