

Chembur Cat Serial Killer Arrested
कुर्ला : परिसरात फिरणाऱ्या सहा भटक्या मांजरांच्या डोक्यावर प्रहार करत अज्ञात व्यक्तींनी या मांजरांना ठार केल्याची घटना चार दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात समोर आली होती. याबाबत आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करत शीवा जोशी (वय ४०) या आरोपीला अटक केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
चेंबूरच्या पांजरापोळ सर्कल परिसरात असलेल्या शनी मंदिर परिसरात रविवारी ही घटना घडली होती. या परिसरात अनेक भटक्या मांजरी असून याच परिसरात राहणारी रुबिना पठाण (वय ५३) ही महिला या भटक्या मांजरांना रोज जेवण देत होती. रविवारी देखील नेहमीप्रमाणे ती मांजराना जेवण देण्यासाठी शनिमंदिर परिसरात गेली होती.
यावेळी त्यांना याठिकाण पहिल्यांदा दोन मांजर मृत अवस्थेत मिळून आल्या. यावेळी या दोन्ही मांजराच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झालेला होता. त्यानंतर काही अंतरावर त्यांना आणखी चार मांजर मृत अवस्थेत मिळून आल्या. या मांजरांना देखील अशाच प्रकारे डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
याबाबत त्यांनी तत्काळ आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासात याच परिसरात राहणाऱ्या शीवा जोशी यांनी या मांजरांची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार आरसीएफ पोलिसांनी शुक्रवारी या आरोपीला अटक केली असून तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.