

मुंबई। पुढारी डेस्क
चाटर्ड अकाऊंटंट अर्थात सीए झालेल्यांसाठी नववर्ष अतिशय आंनदाचे जाणार आहे. आयसीएआय या संस्थेने तब्बल ८ हजार सीएंना २४१ कंपन्यांमध्ये नोकरी दिली आहे. जानेवारीपासून हे सीए कंपन्यांमध्ये रूजू होतील. यातील सर्वांधिक पगाराचे पॅकेज २६.७० लाख रुपयांचे आहे.
आयसीएआयच्या कॅम्पसमध्ये नुकत्याच सीएंच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये नोव्हेंबर २०२३मध्ये परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेले तसेच मे २०२४मध्ये या परी-क्षेत यश मिळवलेल्या सीएंचा समावेश होता. आजवरचा हा ६० वा मुलाखतीचा कार्यक्रम होता. तो फेब्रुवारी २०२४ आणि मे २०२४ या दोन टप्प्यांत घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३००२ आणि दुसऱ्या टप्प्यात ४७८२ उमेदवार सहभागी झाले होते. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक पगार होता तो २९ लाखांचा जो दीएगो इंडिया या कंपनीने दिला. तर दुसऱ्या टप्प्यात २६.७० लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले. अर्थात नेहमीपेक्षा पगाराचे पॅकेज यावेळी सरासरी पाहता कमीच होते. ते १३.२४ लाख आणि १२.४९ लाख असे खाली घसरले. या मुलाखती देशातील ९ मुख्य केंद्रांवर पार पडल्या. त्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या मोठ्या शहरांचा समावेश होता, त्याचबरोबर २० लहान केंद्रांवरही या मुलाखती घेण्यात आल्या.
आयसीएआयचे धीरज खंडेलवाल यांनी सांगितले की, नोकरी मिळालेली आकडेवारी फारच आशादायी आहे. हे क्षेत्र विस्तारत आहे. विविध कंपन्यांमध्ये सीए झालेल्या उमेदवारांना मोठी मागणी आहे. यावेळी मुलाखत घेणाऱ्या कंपन्यांमध्येही मोठी वाढ नोंदवली गेली. येत्या २४ आणि २५ जानेवारीला विदेशातील कंपन्यांमध्ये सीए झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळावी यासाठी विशेष कॅम्प भरवण्यात येणार आहेत. संयुक्त अरब अमिरात तसेच आशिया आणि यूरोप खंडातील अनेक देशांमधील कंपन्या या कॅम्पमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या अभ्यासक्रमाचे जगभरात ९ लाख ८५ हजार विद्यार्थी आहेत, अशी माहितीही खंडेलवाल यांनी दिली.