Mango Cashew Farme : आंबा-काजू बागायतदारांना नुकसानभरपाई देणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankulePudhari
Published on
Updated on

मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात बुधवारी आयोजित केलेल्या बागायतदारांच्या शिष्टमंडळाला संबोधित करताना ते बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी नुकसानीचे पंचनामे अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचा वेग वाढवून सर्वेक्षण लवकरात लवकर संपवावे.

विमा कंपन्या आपल्या जबाबदाऱ्या टाळत असल्याच्या तक्रारीची दखल घेत, महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे, या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

सध्या जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत तुटपुंजी आहे. आंब्यासाठी हेक्टरी ५ लाख आणि काजूसाठी ३ लाख रुपये मदत मिळावी. तसेच एनडीआरएफच्या मदतीसह कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

कोकणी बागायतदार हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. संकट मोठे आहे. केवळ तांत्रिक निकषांवर बोट न ठेवता, नियमांच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त आर्थिक बळ देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून बागायतदारांच्या हिताचा अत्यंत ठोस तोडगा जाहीर करू.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news