

Chandrashekhar Bawankule Maharashtra Drought Meeting
सुशांत सावंत, मुंबई
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समित्यांनी निधीचे वाटप करताना सिमेंट रस्ते आणि गटारींच्या कामांना फाटा देऊन पिण्याचे पाणी व जलसंधारणाच्या कामांवर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासमवेत बुधवारी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्याची बैठक घेतली. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व विविध विभागांच्या सचिवांसह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
सिमेंट रस्त्यांऐवजी 'शिवकालीन बंधारे' आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्यातील मृत झालेले व जुने साठवण बंधारे तातडीने जिवंत करावेत आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे पुनर्भरण करावे, असेही बावनकुळेंनी सांगितले.
बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमके काय आदेश दिले?
१. फक्त डिजिटलच सर्वेक्षणावर भर न देता प्रत्यक्षात बांधावर जाऊनही सर्व्हेक्षण झाले पाहिजे, आणि पीक पंचनामेही प्रत्यक्ष बांधावर जाऊन करावे.
२. पंचनामे करताना ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी या तिघांनीही सोबत असले पाहिजे.
३. पंचनाम्याची एक प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करावी आणि केलेले पंचनामे तातडीने ग्रामसभेपुढे मांडून मंजूर करून घ्यावेत.
४. विजेच्या मागणीत वाढ झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन विजेचे योग्य नियोजन करावे.
५. अंगणवाड्यांना तातडीने वीज कनेक्शन द्यावे आणि अभियंत्यांनी प्रत्यक्ष ग्राऊंडवर उपस्थित राहावे.
६. दुष्काळी परिस्थितीत लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुष्काळी भागात नागरिकांनी पाण्यासाठी किंवा इतर प्रश्नांसाठी मोर्चे काढल्यास, अधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन स्वतः स्वीकारावे आणि चर्चेतून तातडीने मार्ग काढावा.
७. प्रशासनाने आता दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन यावर लक्ष केंद्रित करावे.