मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी अभियांत्रिकी व देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येेणार आहे. माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकलसेवा सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 वाजेपर्यंत बंद राहील.
ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 15.51 वाजेपर्यंत सुटणार्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा येथे पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित स्थानकावर या गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे 15 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
पश्चिम रेल्वेवर आज-उद्या मध्यरात्री ब्लॉक
पश्चिम रेल्वेने शनिवार-रविवारच्या मध्यरात्री, म्हणजे 23-24 ऑगस्ट 2025 रोजी वसई रोड यार्ड येथे मालगाड्यांच्या मार्गिकेवर पहाटे 12.30 ते 4:30 पर्यंत जम्बो ब्लॉक घेतला जाईल. रविवारी या मार्गावर दिवसा ब्लॉक घेतला जाणार नाही.
हार्बरवर पाच तासांचा ब्लॉक
ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 16.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ठाणे येथून सकाळी 10.35 ते दुपारी 16.07 वाजेपर्यंत सुटणार्या वाशी / नेरुळ / पनवेलकडे जाणार्या डाऊन मार्गावरील सेवा तसेच पनवेल ते नेरुळ ते वाशी येथून सकाळी 10.25 ते दुपारी 16.09 वाजेपर्यंत सुटणार्या ठाण्याकडे जाणार्या अप मार्गावरील गाड्या रद्द राहतील.