Shivaji Maharaj history : ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमात शिवरायांचा इतिहास 68 शब्दांत!
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले असतानाच दुसरीकडे सीबीएसईच्या संपूर्ण अभ्यासक्रमात शिवरायांचा केवळ एकच धडा असून, त्यामध्ये फक्त 68 शब्दांमध्ये त्यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा इतिहास मांडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराजांच्या या अवमानाबद्दल सत्ताधारी शिवसेनेच्या आमदार भावना गवळी यांनी सरकारला धारेवर धरत रोष व्यक्त केला. दरम्यान, सीबीएसईच्या अभ्यासक्रमात शिवरायांचा विस्तृत इतिहास समाविष्ट करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. आवश्यक वाटल्यास केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत ठाण मांडू, अशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत प्रश्न मांडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे. तसेच, सीबीएसईच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास हा देशातल्या विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे. परंतु, सीबीएसईच्या इतिहासाच्या पुस्तकात केवळ 68 शब्द छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहेत, हे अपमानास्पद असून, सरकारच्या उदासीन कारभारावर तांबे यांनी नाराजी व्यक्त केली.
सरकारने इतक्या गंभीर मुद्द्यावर केवळ प्रस्ताव पाठवून हात झटकले, यावरून सरकारची उदासीनता दिसून येते, अशी टीकाही तांबे यांनी केली. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार भावना गवळी, अमित गोरखे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटून सविस्तर व अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करण्याची विनंती केली आहे. त्यांनी अभ्यासक्रम समाविष्ट करण्याबाबत आश्वासन दिले आहे.
यासंदर्भात पाठपुरावा करून आवश्यक वाटल्यास केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत ठाण मांडू. तसेच, नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करताना राज्याचा इतिहास व भूगोल यासंदर्भात सविस्तर माहिती असावी याची काळजी घेतली आहे, असे राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.
भावना गवळींकडून घरचा आहेर
सीबीएसईचा पॅटर्न हा कित्येक वर्षांपासून इंग्रजी शाळांत राबवला जातो आहे. तरीही शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. हिंदुत्ववादी सरकारची भूमिका संभ्रम निर्माण करणारी असल्याचे सांगत सत्ताधारी शिवसेनेच्या आमदार भावना गवळी यांनी निषेध करत सरकारला घरचा अहेर दिला. मंत्री फक्त चर्चा केल्याचे सांगत आहेत; मग इतकी वर्षे तुम्ही काय केलेत. दिल्लीत ठाण मांडून हा प्रश्न सुटणार आहे काय, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असताना, सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ 68 शब्द आहेत. दिल्लीत धर्मेंद्र प्रधान मंत्री असून, सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

