

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसह अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेमार्फत (एनसीटीई) 'मेंटॉरिंग इनिशिएटिव्ह फॉर टीचिंग, रिसर्च अँड असेसमेंट' (मित्रा) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांना अन्य शिक्षकांचे मार्गदर्शक (मेंटर) म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली आहे. यामध्ये अनुभवी शिक्षक मेंटर म्हणून, तर मार्गदर्शनाची आवश्यकता असलेले सेवेत असलेले शिक्षक मेंटी म्हणून सहभागी होतील. त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण आणि नियमित मार्गदर्शनातून अध्यापन कौशल्ये अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपल्या संलग्न शाळांमधील पात्र शिक्षकांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक शाळेतून किमान तीन ते पाच अनुभवी शिक्षकांची मेंटर म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी करण्यासाठी संबंधित शिक्षकांकडे किमान आठ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निश्चित केलेल्या मार्गदर्शन क्षेत्रांपैकी एक किंवा अधिक क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्य, प्रभावी संवादकौशल्य, डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि या उपक्रमासाठी योगदान देण्याची तयारी असणे आवश्यक आहे. पात्र शिक्षकांना एनएमएम पोर्टलवर [https://nmm.ncte.gov.in) या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.
अध्यापनशास्त्राबरोबरच आधुनिक शिक्षणातील विविध विषयांचा समावेश या उपक्रमांतर्गत करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता, कौशल्याधारित शिक्षण, वर्ग व्यवस्थापन, बालविकास आणि मानसशास्त्र, समावेशक शिक्षण, मानसिक आरोग्य, आर्थिक साक्षरता, मूल्यशिक्षण, अनुभवाधारित शिक्षण, योग आणि ध्यान अशा विविध क्षेत्रांत शिक्षकांना मार्गदर्शन करता येणार आहे. तसेच गणित, विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आदी विषयांच्या अध्यापनशास्त्राचाही समावेश आहे.