

मुंबई : एका वर्षात विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असून विशेष म्हणजे शाळेने दिलेल्या उपस्थितीचा अहवाल तपासण्यासाठी अचानक भेटी देण्यात येणार असल्याबाबतचे कडक नियम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहेत.
शाळा ही केवळ शैक्षणिक शिक्षणाची केंद्रे नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. विषयाचे ज्ञान देण्याबरोबरच, शाळांमध्ये अभ्यासेतर उपक्रम, चारित्र्य घडवणे, मूल्यांचा संवर्धन, संघकार्य आणि बरेच काही शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदी तपासण्यासाठी शाळांना भेट देण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान नोंदी अपूर्ण असल्याचे आढळून आल्यास किंवा विद्यार्थी नियमित हजेरी लावत नसल्याचे स्पष्ट झाल्यास शाळेवर कडक कारवाई होऊ शकते. बोर्ड केवळ वैद्यकीय आणीबाणी, राष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग व इतर कारणांसाठी २५ टक्के सूट देत असल्याचे म्हटले आहे.