Cash Land Transactions | दोन लाखांवरील रोखीचे जमीन व्यवहार ‘आयकर’च्या ‘रडार’वर!

राज्य सरकार स्‍वत: देणार माहिती; पारदर्शकतेसाठी निर्णय
Cash Land Transactions |
Cash Land Transactions | दोन लाखांवरील रोखीचे जमीन व्यवहार ‘आयकर’च्या ‘रडार’वर!File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : दस्त नोंदणी करताना दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिलेल्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला कळविण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात येणार आहे. दस्त नोंदणीच्या वेळीच रोख व धनादेशाद्वारे दिलेल्या रकमेची स्वतंत्र नोंदीची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ‘आय-सरिता’ प्रणालीत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांना यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश शुक्रवारी (दि. २०) दिले.

मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिली किंवा स्वीकारल्यास त्याची माहिती आयकर विभागाला देणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे १६ एप्रिल २०२५ रोजीचे आदेश, तसेच आयकर कायद्यातील तरतुदींनुसार महसूल विभागाने याबाबत निर्देश दिले होते. यानुसार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना रोख व्यवहारांची माहिती आयकर विभागाला पाठविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा रोख व्यवहार झालेल्या दस्तांची माहिती दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत आयकर विभागाला पाठविणे आवश्यक आहे.

ही प्रक्रिया अधिक सोपी व अचूक करण्यासाठी ‘आय-सरिता’ प्रणालीत बदल केले जातील. दस्त नोंदणी करतानाच खरेदीदाराने विक्रेत्याला किती रक्कम रोखीने व किती धनादेशाद्वारे दिली, याची स्वतंत्र नोंद करता येईल. त्यामुळे व्यवहाराचा संपूर्ण तपशील नोंदणीच्या वेळीच उपलब्ध होईल. माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्रपणे करावी लागणारी प्रक्रिया कमी होणार आहे.

खरेदीदारांचा स्वतंत्र तपशील

या सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे, व्यवहारात एकापेक्षा अधिक खरेदीदार किंवा विक्रेते असल्यास प्रत्येकाचा स्वतंत्र आर्थिक तपशील नोंदविता येईल. कोणत्या खरेदीदाराने किती रक्कम दिली आणि कोणत्या विक्रेत्याने किती रक्कम स्वीकारली, याची स्वतंत्र माहिती प्रणालीत उपलब्ध होईल. त्यामुळे प्रत्येक पक्षकाराच्या व्यवहाराचा अचूक तपशील आयकर विभागाला पाठविणे शक्य होईल.

दर महिन्याला ‘एसएफटी’ अहवाल

दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत आर्थिक व्यवहारांचा माहिती (एसएफटी) अहवाल आयकर विभागाला पाठविला जाईल. यात खरेदीदार व विक्रेत्याचे नाव, पॅन क्रमांक, व्यवहाराची रक्कम, रोख रक्कम, दस्त क्रमांक व नोंदणी दिनांक यांचा समावेश असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.