

कोपरखैरणे : इच्छितस्थळी जाण्यासाठी गुगल मॅपच्या वापरामुळे देशभरात वाहनांचे अपघात वाढले आहेत. असाच एक अपघात नवी मुंबईतील बेलापूर येथे शुक्रवारी पहाटे घडला. मॅपनुसार कार बेलापूर येथील पुलावरून न जाता पुलाखालून गेली आणि कार थेट खाडीत जाऊन कोसळली.
कारसह चालक महिला खाडीत वाहून जात असताना हा प्रकार सागरी पोलिसांच्या लक्षात आला आणि ते तिच्या मदतीला धावून गेले. त्यामुळे या महिलेचा प्राण वाचू शकला. शुक्रवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महिला कारचालक उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपवर सरळ रस्ता दाखवला गेल्याने तिने पुलावरून न जाता, खालील पर्यायी मार्ग निवडला. मात्र, तो मार्ग थेट ध्रुवतारा जेट्टीकडे जातो. मात्र हे तिच्या लक्षात आले नाही आणि कार अनपेक्षितपणे थेट खाडीत कोसळली.
जवळच गस्त घालणार्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ बोटीच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेत वाहत असलेल्या महिलेचा जीव वाचवला. अपघातग्रस्त कारलाही क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. ही घटना सागरी पोलीस चौकीसमोरच घडल्याने वेळेवर मदत पोहोचली आणि अनर्थ टळला, अशी माहिती नारायण पालमपल्ले यांनी दिली.