Cabinet Reshuffle | केंद्र, राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत

गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा
Cabinet Reshuffle |
Cabinet Reshuffle | केंद्र, राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतानाच केंद्रीय मंत्रिमंडळासह राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारावर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत्या. मात्र, त्या रखडल्या. पुढच्या आठवड्यात अधिवेशनाचे कामकाज संपणार आहे. त्यानंतर हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणेनंतर विस्ताराचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा आहे. या संभाव्य विस्तारात शिवसेना शिंदे गटाला दोन मंत्रिपदांची अपेक्षा आहे. श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव यांचा शिवसेनेकडून मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, अलीकडेच ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत आलेले ओमराजे निंबाळकर यांचेही नाव आता पुढे आणले जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील या विस्तारासोबत राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबतही शहा यांच्या सोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. राज्यातील फडणवीस सरकारला आता दीड वर्ष झाले आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करून आगामी राजकारण समोर ठेवत मंत्रिमंडळात फेरबदलाची मागणी जोर धरत आहे. केंद्रातील फेरबदलानंतर राज्यातील मंत्रिमंडळातही फेरबदलांची शक्यता वर्तविली जात आहे.

शहांशी चर्चेनंतर शिंदे पुन्हा दिल्लीकडे

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतील दौरे सध्या वाढले आहेत. शुक्रवारी शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी मुंबईत अमित शहा, फडणवीस यांच्यासह राजकीय चर्चांची बैठक पार पडली. अमित शहा दुपारी मुंबईतून पुढे रवाना झाल्यानंतर एकनाथ शिंदेसुद्धा पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र, शिवसेनेकडून दरवर्षी दिल्लीत रक्तदान शिबिर घेतले जाते. त्या शिबिरासाठी शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेना फुटीवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे आणि शेऱ्यांमुळे राज्यात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. या सुनावणीबाबतही शिंदे यांनी शहा यांच्याशी सल्लामसलत केल्याचे समजते.

अमित शहा यांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारली!

अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटीची वेळ दिली नसल्याचे समजते. शहा यांची ‘सह्याद्री’वर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडूनही भेटीची वेळ मागितली गेली होती. मात्र, त्यांना वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे केवळ फडणवीस, शिंदे आणि शहा अशीच चर्चा झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रशांत किशोर यांच्यासोबत चालविलेली सल्लामसलत भाजपला रुचलेली नाही. त्यामुळेच अमित शहा यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news