पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प भारतातील रोजगार निर्मितीला मोठी चालना देणारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Budget 2024)
ते पुढे म्हणाले की, रोजगारनिर्मितीसाठी सरकारी क्षेत्रांबरोबरच खासगी क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. भारत पहिल्या क्रमांकाचे स्टार्ट अप देश व्हावा आणि देशात जास्तीत जास्त उद्योजक तयार व्हावेत. यासाठी एंजल करात सवलत दिली जाणार आहे. तसेच मुद्रा कर्ज योजनेची मर्यादा प्रती व्यक्ती १० लाख रुपयांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. (Budget 2024)
भारताच्या कर्मचारी वर्गातील स्त्रियांच्या वाढत्या प्रमाणावरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भारताला देशातील कर्मचारी वर्गातील तरुण स्त्रियांचे प्रमाण आणखी वाढवून लोकसंख्येमुळे मिळणारा लाभांश आणखी विस्तारणे शक्य होईल. कौशल्य विकासाला रोजगार निर्मितीचा भाग बनवण्याची अभिनव संकल्पना त्यांनी मांडली असून दरम्यान पायाभूत सुविधांवरील खर्च अबाधित ठेवला आहे. (Budget 2024)
वित्तीय तूट ५.१ टक्क्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी करत ४.९ टक्क्यांवर आणली आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष कररचनेला फारसा धक्का न लावता साधता येणार असल्यामुळे भारतातील दीर्घकालीन कर्ज रेटिंग सुधारेल व २०२५-२६ मध्ये वित्तीय तूट ४.५ टक्क्यांपर्यंत आणण्याचा मार्ग सुकर होईल. एकंदरीत १० पैकी १०. (Budget 2024)