

मुंबई : बहिणीच्या प्रियकराची भावाने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. नितीन प्रेमजी सोलंकी असे या 40 वर्षीय व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी आशिष जोसेफ शेट्टी या 21 वर्षांच्या आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. हत्येनंतर तो स्वत:हून पोलीस ठाण्यात आला आणि त्याने नितीनची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर आशिषला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने गुरुवार 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नितीन सोलंकी हा जोगेश्वरी येथे राहात असून एका रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कामाला होता. त्याचे मालाडच्या मालवणी परिसरात राहणार्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्यासह तिच्या आईविषयी अपशब्द काढून त्यांच्या चारित्र्याविषयी सतत वादग्रस्त विधान करत होता. ही माहिती नंतर प्रेयसीचा भाऊ आशिष शेट्टीला समजली होती. याच कारणावरुन आशिष आणि नितीन यांच्यात वाद सुरु होता. याच वादातून त्याने त्याचा कायमचा काटा काढायचे ठरविले होते.
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री साडेदहा ते शनिवारी पहाटेपर्यंत या दोघांनी मद्यप्राशन केले होते. सकाळी ते दोघेही जोगेश्वरी येथून मालाडच्या मालवणी, मार्वे रोड, रामेश्वर गल्लीतील कोळीवाडा कृष्णा आश्रमाजवळील रुम क्रमांक एकमध्ये आले होते. तिथेच त्याने नितीनने लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती. त्याची हत्या केल्यानंतर तो मालवणी पोलीस ठाण्यात आला आणि तिथे उपस्थित एपीआय गोकुळ जगताप, उपनिरीक्षक विशाल राऊत यांना घडलेला प्रकार सांगितला. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बेशुद्धावस्थेत असलेल्या नितीनला पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर आशिष शेट्टीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.