प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता : उपमुख्यमंत्री अजित पवार

पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था
Ajit Pawar | अजित पवार
प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता : उपमुख्यमंत्री अजित पवारFile Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दि. 23 : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत, अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातवाईकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संपर्क साधून विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद व सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः लक्ष ठेवून असून, राज्य व केंद्र सरकारी संबंधित यंत्रणांशी ते सातत्याने संपर्कात आहेत. राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेवर ठेवले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी सुध्दा उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना मदतीसह धीर दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील नागरीकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनाने नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधून त्यांना वस्तुनिष्ठ व वेळोवेळी माहिती पुरवली जात आहे. पर्यटकांची यादी, त्यांच्या वास्तव्याच्या जागा आणि परतीच्या संभाव्य वेळापत्रकाची माहिती संकलित केली जात असून, ही संपूर्ण कार्यवाही समन्वयाने आणि जलदगतीने पार पाडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news