

मुंबई : सीईटीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या चार वर्षांच्या बी. फार्म. (बॅचलर ऑफ फार्मसी) प्रवेशाची पहिली फेरी पार पडली आहे. या फेरीत तब्बल 29 हजार 166 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये पहिल्या पसंतीचे महविद्यालय मिळालेल्या ‘ऑटो फ्रीझ’ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 895 इतकी आहे. प्रवेश मिळालेल्या या विद्यार्थ्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्याची अंतिम संधी आहे.
दरवर्षी बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेवर उशीराचा परिणाम होत असतो. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) कडून संस्थांना दरवर्षी मान्यता घ्यावी लागते. यंदाही ही मान्यता प्रक्रिया सप्टेंबरच्या अखेरीस म्हणजेच 30 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यामुळे अर्ज भरूनही विद्यार्थ्यांना जवळपास चार महिने प्रवेशासाठी थांबावे लागले. अनेक संस्थांना मान्यता न मिळाल्याने तंत्रशिक्षण संचालनालय आणि सीईटी सेलला प्रवेश सुरू करता आले नव्हते. मान्यता प्रक्रिया अंतिम मुदतीपर्यंत लांबली असल्याने या वर्षी प्रवेश उशिरा सुरू झाले. याच कालावधीत विद्यार्थ्यांना मोठा कालावधी देऊन नोंदणी पूर्ण करण्यात आली आणि अखेर प्रत्यक्ष प्रवेशाची सुरुवात झाल्यानंतर प्रवेशाची पहिली यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
यंदा प्रवेशासाठी तयार झालेल्या मेरिट यादीत 55 हजार 116विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना बी.फार्मसी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीसाठी एकूण 44 हजार 287 जागा उपलब्ध होत्या.
या विद्यार्थ्यांपैकी 38 हजार 462 विद्यार्थ्यांनी पर्याय अर्ज भरला होता. यापैकी 29 हजार 166 विद्यार्थ्यांना प्रवेशाचे जागावाटप झाले आहे. यापैकी पहिली पसंती मिळाल्याने ‘ऑटो फ्रीझ’ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 895 इतकी आहे. 15 हजार 121 विद्यार्थी प्रवेशाची प्रतिक्षा आहे.
4 ते 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकारून आवश्यक कारवाई करावी लागणार आहे. तसेच, 6 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात हजेरी लावून कागदपत्रे व फी जमा करणे बंधनकारक असणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी प्रवेशानंतर रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होणार आहे. दुसर्या फेरीसाठी पर्याय अर्ज 8 ते 10 ऑक्टोबरदरम्यान भरता येणार असून 13 ऑक्टोबर रोजी प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर होणार आहे.