Mumbai air pollution : मुंबईची हवा दूषितच; पालिकेला समन्स
मुंबई : मुंबईतील दूषित हवेबाबत उच्च न्यायालयाने दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले असतानाही काही सुधारणा दिसून न आल्याने उच्च न्यायालयाने मुंबई पालिका प्रशासनाला सोमवारी चांगलेच फटकारले. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने दूषित हवा सुधारण्यात पालिका निष्क्रिय असल्याचे निरीक्षण नोंदवत पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्यासह एमपीसीबीच्या सदस्य सचिवांना न्यायालयात उद्या मंगळवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांतील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. तर वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यापूर्वी प्रदूषण कमी करण्याबाबत महापालिकेने काय उपाययोजना केल्या, याची माहिती सादर करण्यास न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने अहवाल सादर केला होता.
दरम्यान, न्यायालयाने नियुक्ती केलेल्या अमायकस क्युरी (न्यायालयीन मित्र) ज्येष्ठ वकील ॲड. दारायुस खंबाटा यांनी न्यायालयाच्या निर्देशांनंतर तीन वकील आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांचा समावेश असलेल्या चार सदस्यीय समितीने 6 ते 13 डिसेंबर याकाळात मुंबई आणि नवी मुंबईतील रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटसारखे औद्योगिक युनिट्स, बांधकाम सुरू असलेल्या इमारती, पायाभूत सुविधा विकास उपक्रम इत्यादींचा समावेश असलेल्या 36 स्थळांची पाहणी केली.
मात्र त्यांचा अहवाल पाहता न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशांचे पालन सक्रिय ऐवजी प्रतिक्रियात्मक स्वरूपाचे झाले आहे. तसेच समितीच्या निष्कर्षांवरून हवेच्या गुणवत्तेच्या देखरेखीचा पूर्ण अभावदिसून येत असल्याकडे न्यायालायचे लक्ष वेधले. याची खंडपीठाने गंभीर दखल घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.
महानगरपालिका आयुक्त आणि एमपीसीबीच्या सदस्य-सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबद्दल स्वतः स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे स्पष्ट करत मंगळवार, 23 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.
समीर ॲपवर एक्यूआय रीडिंग कमी
समितीने सादर केलेल्या अहवालात, मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकचे निरीक्षण करणारे समीर ॲप तृतीय-पक्ष ॲप्सच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी एक्यूआय रीडिंग दर्शवत आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेन प्रकल्प, आरएमसी प्लांट आणि मेट्रो मार्गिका 2ब या तिन्ही ठिकाणी पालिका आणि एमपीसीबीने घालून दिलेल्या प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे पालन होत नाही.

