

मुंबई : आबुधाबी येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या दिलावर मोहम्मद अक्रम खान मेंजई ऊर्फ अली मेहमूद खान या अफगाणी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली.
दिलावर मोहम्मद अक्रम खान मेंजई ऊर्फ अली मेहमूद खान हा गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होता, याच दरम्यान त्याने बोगस भारतीय पासपोर्ट बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव येथे राहणारे बापूराव दिलीप खांडेकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी ते विदेशात जाणाऱ्या प्रवाशांचे इमिग्रेशनची तपासणी करत होते. यावेळी तिथे आलेल्या मेहमूद खान नावाच्या प्रवाशाला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या पासपोर्टवर दोन वेळा अफगाणिस्तानचा व्हिसा लागल्याचे दिसून आले. त्याच्या बोलण्यावरून तो अफगाणी नागरिक असल्याचा संशय आल्याने त्याची या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती.