

मुंबई: मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करण्यात येत आहे. अलीकडेच महापौरांसह विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी व अधिकाऱ्यांसाठी करोडो रुपयांची वाहन खरेदी केल्यानंतर आता पाणीपुरवठा विभागासाठी 1 कोटी 8 लाख रुपयांची वाहन खरेदी करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने नवनिर्वाचित महापौरांसाठी इनोव्हा हायब्रीड गाडीसह विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी महिंद्राच्या स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या आहेत. त्याशिवाय पालिकेच्या काही खाते प्रमुखांसाठीही स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आले आहे. या सर्व गाड्यांची किंमत तीन ते चार कोटी रुपये इतकी आहे.
आता पुन्हा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागासाठी 14 महिंद्रा बोलेरो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या ताफ्यामध्ये विविध विविध विभागातील खाते प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 379 कार, जीप, पिकअप, बस, टँकर या प्रकारची वाहने आहेत. या वाहनांचे आयुर्मान संपल्यानंतर ती वाहने मोडीत काढून त्या बदल्यात नवीन वाहने घेण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
सध्या कार्यकारी अभियंता (परिवहन) पाणीपुरवठा व मलनिःसारण विभागांत 128 जीप वाहने असून, शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व नगरबाह्य विभागातील विविध खात्यांतील अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाकरीता ही वाहन दिली जातात.
त्यातील, 14 गाड्या महिंद्रा आणि महिंद्रा बोलेरो बनावटीच्या जीप असून ही वाहने 2010 मध्ये खरेदी करण्यात आलेली होती. या वाहनांना मार्च 2026 मध्ये 15 वर्षे पूर्ण झाली असून, त्यामुळे ही वाहने मोडीत काढण्यात येणार आहेत. परिणामी या खात्यात वाहनांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. यासाठी तातडीने नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.