

मुंबई : कचरा दुर्गंधीमुक्त मुंबईसाठी भूमिगत कचरापेटी हा उपाय आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. महापालिकेने आतापर्यंत 38 ठिकाणी या भूमिगत कचरा पेट्या उभारल्या असून महापालिका रुग्णालयांना प्राधान्य देत तेथे 17 पेट्या बसवल्या आहेत.
उघड्या कचरा पेट्यांमुळे पसरणारी दुर्गंधी व आरोग्य समस्या यावर उपाय म्हणून महापालिकेने प्रायोगिक तत्वावर फोर्ट ए, ग्रँटरोड डी, मालाड पी/उत्तर व बोरिवली आर/मध्य विभागातील एका ठिकाणीआधुनिक भूमिगत स्वरुपाचे 2.2 घनमीटर क्षमतेचे डबे बसवले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्याने पालिका प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी या पेटया बसविण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत केईएम, सायन कस्तुरबा, नायर, जीटीबी हॉस्पिटलच्या आवारासह 38 ठिकाणी भूमिगत कचरापेटी बसवण्यात आल्या आहेत.
तर येणार्या काळात सीएसएमटी, चर्चगेट, दादर, कुर्ला, अंधेरी, बोरीवली, बांद्रा, या प्रमुख रेल्वे स्टेशनसह अन्य स्टेशनलगत भूमिगत कचरा पेट्या उभारल्या जाणार आहेत. त्याशिवाय मुंबईतील दादर, अंधेरी, बोरीवली, व अन्य मार्केट परिसर, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू, राणीबाग मान्य पर्यटन स्थळी भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये पेट्या बसवण्यात येणार आहेत. हॉस्पिटलमध्ये अन्य कचर्यासोबत जैविक कचराही मोठ्या प्रमाणात जमा होतो. हा जैविक कचरा योग्य प्रकारे जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. पण प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवलेला हा जैविक कचरा उंदीर, घुशी व भटके कुत्रे पिशव्या फाडून त्यातील कचरा अस्ताव्यस्त करतात. यासाठी भूमिगत कचरापेटी फायदेशीर ठरणार असल्याचे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.
भूमिगत कचरा पेटीचा प्रयोग यशस्वी
केईएम 6, सायन शीव 4, नायर 2, कस्तुरबा 2 आणि जीटीबी 3 अशाप्रकारे हॉस्पिटलमध्ये 17 भूमिगत कचरा पेट्या बसवल्या आहेत. तर अन्य पेट्या 21 पेट्या शहरातील अन्य भागात बसवण्यात आल्या आहेत.